गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची शोभायात्रा उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण !
पुण्यातील विविध शाळांतील बालकांनी घेतला बालनाट्यांचा आनंद !
पुणे : पुण्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आज (दि.20) पासून बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची सुरुवात रंगतदार शोभायात्रेने झाली. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲड. निलीम शिर्के-सामंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि बालप्रेक्षकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सकाळच्या सत्रात जळगाव, नाशिक, रत्नागिरी, अहिल्यानगर येथील बालकलावंतांच्या गाजलेल्या बालनाट्यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. यात म्हावरा गावलाय गो (नाट्यरंग, जळगाव), विंडो 98 (मोहिनीदेवी रुंगठा शिक्षण मंडळ, नाशिक), फुलपाखरु (नाट्यआराधना, अहिल्यानगर), दहा वजा एक (दामले विद्यालय, रत्नागिरी) यांनी सादर केलेल्या बालनाट्यांना उपस्थित बालप्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर प्रख्यात चित्रकार अरुण दाभोळकर यांच्या हस्ते कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. याव्ोळी ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के-सामंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. चित्रकार अरुण दाभोळकर यांनी सोप्या पद्धतीने चित्रे कशी काढावीत या विषयी युक्ती सांगत प्रात्याक्षिकांसह चित्रे काढून दाखविली. हा कार्यक्रम सुधा करमरकर रंगमंचावर झाला.
आकर्षक शोभायात्रा
दुपारी 3.30 वाजता शोभायात्रेचा शुभारंभ शिळीमकर विद्यालय, बिववेवाडी येथून करण्यात आला. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील बालकलावंतांसह पुणे शहरातील विविध शाळा, संस्थांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत चित्ररथांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. महापुरुषांच्या व्ोशभूषा केलेले बालकलावंत, फुगे आणि फुलांनी सजविलेला चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. शोभायात्रेत लेडीज इंग्लिश मिडियम स्कूल, ठेंगोडे येथील विद्यार्थिनींनी अध्यात्म आणि ऐतिहासिक विषयांवर सादरीकरण केले, तर मावळ्यांच्या वेशभूषेत साकारलेल्या पारंपरिक चित्ररथाला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. विशेष मुलांच्या सेवा संस्थेतील विद्यार्थ्यांनी या वेळी प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधले.
नंदुरबार शाखेने सादर केलेल्या आदिवासी नृत्याला तसेच मंगळवेढा शाखेने सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. जळगाव शाखेच्या बालकलावंतांचे लेझीम नृत्य, तर उत्कर्ष मतिमंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. पुणे आणि नाशिक शाखांच्या विद्यार्थ्यांनी अनोखे सादरीकरण केले. रत्नागिरी शाखेने सादर केलेल्या आधुनिक भारत विषयावरील चित्ररथ विशेष आकर्षण ठरला. बालरंगभूमी गीताला उपस्थितांनी दाद दिली. शोभायात्रेची सांगता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे झाली.
संमेलन प्रवेशद्वाराचे उद्घाटन
अण्णा भाऊ साठे स्मारक रंगमंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्या हस्ते फीत कापून संमेलन प्रवेशद्वाराचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. या व्ोळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के-सामंत, बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ अन्सारी शेख, कार्यकारिणी सदस्य धनंजय जोशी, दीपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, आनंद जाधव, त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते.