Marathi FM Radio
Monday, January 13, 2025

पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य-कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

शासकीय अधिकाऱ्यांमधील दडलेले ‌‘कलाकार‌’ पुणेकरांसमोर !!

पहिल्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनानिमित्त साहित्य-कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन !

पुणे : शासकीय कार्यालयातील कागदांमागे दडलेले चेहरे हे नेहमीच रुक्ष आणि लालफितीच्या बंधनात अडकलेले नसतात तर त्यांच्यातही एक छुपा कलाकार दडलेला असतो. साहित्यिक, छायाचित्रकार, चित्रकार, शिल्पकार, संग्राहक अशा कलेच्या क्षेत्रात उंच उंच भरारी घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचे कलागुण पुणेकर रसिकांसमोर आज आले. निमित्त होते शासकीय अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचे.

Advertisement

मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन दि. 20 ते दि. 22 डिसेंबर या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालनात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य-कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून याचे उद्घाटन आज (दि. 20) करण्यात आले.

Advertisement

Advertisement

या वेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, माजी कुलगुरू एस. एस. मगर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी मंचावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलन कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा शनिवार, दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.

Advertisement

पुण्यासह राज्यातील जवळपास 20 अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृती आणि साहित्यकृती या प्रदर्शनात आहेत. अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, छायाचित्रे, चित्रे, जुनी नाणी व नोटा, काष्ठशिल्पे तसेच खडूवर साकारलेली शिल्पे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

Advertisement

कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती देताना संयोजक सुनील महाजन म्हणाले, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा याचे निमित्त साधून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे सांस्कृतिक मन जपले पाहिजे या हेतूने प्रथमच संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन अधिकारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित अधिकाऱ्यांच्या साहित्यकृती व कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना एस. एस. मगर, सुनील महाजन, कृष्णकुमार गोयल, पृथ्वीराज बी. पी., निरंजन सुधांशू, शेखर गायकवाड, डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुरली लाहोटी, राजीव नंदकर आदी.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू म्हणाले, प्रदर्शन आणि संमेलनाच्या निमित्ताने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात लपलेले कलागुण समाजासमोर आले आहेत. अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव येत असतात परंतु ते शब्दरूपात मांडण्यासाठी वेळ मिळू शकत नाही. या उपक्रमाच्या निमित्ताने एक नवीन चांगली सुरुवात होत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन यशदाच्या ग्रंथालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतींचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, असा मानस त्यांनी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता यशदाच्या इमारतीत कायम स्वरूपी प्रदर्शनी मांडण्यात येईल.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, विद्येच्या माहेरघरात अधिकाऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन करणे हा अभिनंदनीय उपक्रम आहे. याची कीर्ती सर्वत्र पोहोचेल. पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनांप्रमाणेच सारस्वताचे हे वैभव रसिकांसाठी खुले होत आहे याचा आनंद आहे.

प्रशासकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची वेगळी रूपे यानिमित्ताने समोर येत आहेत. साहित्यकृती मनावर संस्कार करणाऱ्या असतात यातूनच वाचनसंस्कृतीतही वाढ होईल अशी आशा आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतींचा दिवाळी अंक, ई-बुक्स प्रकाशित व्हावीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या गर्दीत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढ व्हावी या करीता कृती होणे आवश्यक आहे.


पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात वाढ व्हावी या करीता एक छोटे पाऊल उचलले आहे. असे विविध उपक्रम करण्याकरीता पुणे महानगरपालिका कायमच सहकार्याच्या भूमिकेत असेल. इतर क्षेत्रातील शासकीय अधिकारी देखील अशा माध्यमांमधून जगासमोर यावेत अशी सदिच्छा आहे.
डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुरली लाहोटी तसेच कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
शेखर गायकवाड लिखित इलेक्शन स्क्रुटिनी ॲन्ड नॉमिनेशन, सरकारी ऋतुचक्र, भावना आटोळे लिखित उत्तर भारतातील मंदिरे, शंकरराव मगर लिखित विद्येच्या प्रांगणातील संघर्षयात्री, गणेश चौधरी लिखित ग्रामीण विकासातील माझे प्रयोग, दिगंबर रोंधळ लिखित कुळकायदा, राजीव नंदकर लिखित सुखाचा शोध या साहित्यकृतींचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले तर आभार राजीव नंदकर यांनी मानले.

 

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular




More forecasts: oneweather.org