बालगोपाळांना घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन
जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे उपक्रम !
पुणे : जागतिक संग्रहालय दिनाचे औचित्य साधून येरवडा, दहा चाळ, कसबा पेठेतील विविध वयोगटांतील जवळपास 60 बाल-गोपाळांना बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे कॅम्पमधील संग्रहालयाची अनोखी सफर आज घडविण्यात आली.
संग्रहालय म्हणजे आपल्या ऐतिहासिक वस्तूंचा अमूल्य ठेवा. पुरातन काळातील वैविध्यपूर्ण संस्कृती या संग्रहालयात अतिशय निगुतीने सांभाळली जाते.
पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय येथे या मुलांनी भेट देऊन तेथील आदिवासी जमातीची सांस्कृतिक माहिती, विविध वाद्ये, आभूषणे, लाकडापासून बनविलेल्या विविध वस्तू, टोपल्या, चित्रकृती, मुखवटे, हत्यारे यांची पाहणी केली. या वस्तू न्याहळताना मुलांच्या चेहऱ्यावर कुतुलहमिश्रीत अनोखे भाव दिसून येत होते.
साईनाथ मित्रमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियुष शाह यांनी या मुलांना आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा, जतन केलेल्या वस्तूंची सविस्तर माहिती दिली.
नवज्योत मित्र मंडळ, येरवडाचे अमित जाधव, शुभम पोळ, राहुल रजपूत, अखिल रामनगर मित्र मंडळ येरवडाचे राकेश चव्हाण, नील धावरे, श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ कोथरूडचे सचिन पवार, सचिन गोपाळ घरे, विधायक मंडळ कसबा पेठचे अभिषेक मारणे, सतीश नहार, पर्णवी सरदेसाई यांचा कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग होता.
संग्रहालयांना भेट देऊन आपली संस्कृती, वारसा मुलांना समजावा या उद्देशाने ही अनोखी सफर आयोजित करण्यात आली होती.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात