संतमहाताम्याची बेरीज म्हणजे डॉ. श्रीपाल सबनीस यांची विचारधारा !
पुणे : सत्याची बेरीज, सांस्कृतिक पुण्याईची बेरीज, सर्व धर्मातील चांगुलपणाची बेरीज, सर्व संस्कृती प्रवाहातील संचिताची बेरीज म्हणजे श्रीपाल सबनीस यांची विचारधारा असा सूर ‘डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा प्रारूप आणि अंतरंग’ तसेच ‘डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा’च्या प्रकाशन प्रसंगी उमटला.
डॉ. श्रीपाल सबनीस विचारधारा प्रारूप आणि अंतरंग तसेच डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) उद्धव कानडे, सुनिताराजे पवार, सचिन ईटकर, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. शां. ब. मुजुमदार, विश्वास पाटील, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आशुतोष भुपटकर.
डॉ. सबनीस यांच्या साठ पुस्तकांचे डॉ. सुरेश सावंत, डॉ. आशुतोष भुपटकर आणि डॉ. आर. डी. साबळे या तीन संपादकांनी संपादन करून या विचारधारेची निर्मिती केली आहे. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे आणि संस्कृती प्रकाशनतर्फे या विचारधारचे प्रकाशन आज (दि. 17) पत्रकार संघात करण्यात आले. पानिपतकार विश्वास पाटील, समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आशुतोष भुपटकर, सुनिताराजे पवार आणि सचिन ईटकर व्यासपीठावर होते.
महापुरुषांच्या चांगुलपणाची बेरीज करून केवळ देशाच्याच नव्हे तर वैश्विक स्तरावर शांतता प्रस्थापित व्हावी, समाज दु:खमुक्त व्हावा, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना नव्याने अस्तित्वात यावी यासाठी ध्यास आणि श्वास घेत असलेले श्रीपाल सबनीस म्हणजे अस्वस्थ विचारवंत आहेत, असे गौरवोद्गार सिम्बॉयसिसचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी अध्यक्षपदावरून बोलताना काढलेत.
विश्वास पाटील म्हणाले, माणुसकी पोरकी झाल्याच्या काळात कोणत्याही जातीधर्माचा, वर्णाचा सोस न धरता मानवतेचा झेंडा घेऊन डॉ. सबनीस मार्गक्रमण करीत आहेत. आपल्या विचारधारेच्या माध्यमातून डॉ. सबनीस हे ज्ञानाच्या चावडीवर विवेकाच्या वृक्षाखाली उभे राहून साहित्य क्षेत्रात जागरणाचे काम करीत आहेत. सत्यविचार मांडण्याचे धाडस करीत आहेत.
डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, विवेकवादी, सामंजस्याची भूमिका घेत डॉ. सबनीस यांनी साहित्य , परिवर्तनाच्या चळवळीला आपल्या विचारधारेच्या माध्यमातून नवे प्रारूप दिले आहे. सुसंवादी, सगळ्यातील चांगले वेचण्याची आणि आचरणात आणण्याची त्यांची कृती समाजाला योग्य दिशा देणारी आहे. इहवादी, मानवतावादी दृष्टीकोन घेत विचारधारा वाड्यावस्त्यांवर पोहोचविणारा हा साहित्यिक आहे.
चांगल्याशी संवाद , वाईटाशी संघर्ष हा माझा स्वभाव आहे असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले , सर्व महापुरुषांच्या सकारात्मक विचारांची बेरीज ही आजच्या काळात गरजेची आहे. चांगल्यासाठी विश्वाचा नकाशा, संस्कृतीचे क्षितिज मुक्त आहे. पुण्यशील, संचिताचा विचार हाच माझ्या साहित्याचा धागा आहे. सत्येसाठी बेरीज होते मग सत्याची बेरीज का नाही , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्य हे सर्वांचे मूल्य असून तो एक सर्वव्यापी मानदंड आहे. वाटतो तितका मी कठोर नाही तर भावनिक आहे. सगळ्या धर्मांची माणसे जोडून कल्याणकारी भूमिकेतून आपण काम केले पाहिजे. प्रत्येक धर्मात चांगुलपणा आहे त्याचा स्वीकार करून त्रुटी बाजूला सारणे ही माझी भूमिका आहे. गट, तट आणि मठ यामध्ये सध्या समाज अडकला आहे. अशा वेळी चांगुलपणाची बेरीज करत मर्यादांची वजाबाकी करून आपण मानवाच्या सुखासाठी कार्यरत राहिले पाहिजे.
डॉ. श्रीपाल सबनीस आणि ललिता सबनीस यांचा सत्कार डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आला. सचिन ईटकर म्हणाले, सबनीस यांची चांगुलपणाच्या बेरजेची विचारधारा समाजासाठी दिशादर्शक आहे.
मानवतावादी सिद्धांत यात मांडण्यात आले आहेत. सुनीताराजे पवार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात