चारूकाकांच्या आठवणींना सुहृदांनी दिला उजाळा !
पुणे : चारूकाका म्हणजे सर्वांचा आधारवड. त्यांच्या सहवासात जे जे आले त्यांचे आयुष्य समृद्ध होत गेले. पुण्याची संस्कृती जपणारे आणि जाणणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
कुठल्याही अपेक्षेविना त्यांचा मदतीसाठी हात पुढे असायचा. निरपेक्ष भावनेने त्यांनी त्यांच्या सहवासात आलेल्यांवर प्रेम केले. त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा कधी संपला नाही. स्नेह जपताना तात्त्विक-वैचारिक भूमिका कधी आड येऊ दिली नाही, अशा भावना व्यक्त केल्या त्या चारूकाकांच्या सहवास लाभलेल्या सुहृदांनी.
निमित्त होते ते कलाकारांचे माहेरघर अशी ज्यांनी ओळख करून दिली त्या पूना गेस्ट हाऊसचे सर्वेसर्वा कै. चारूकाका सरपोतदार यांच्या जयंतीचे.
पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आज (दि. 15) त्यांच्याविषयी अनेकांनी आठवणी जागविल्या. चारूकाका आजही आपल्यातच आहेत हे जाणविले ते रंगमंचावरील मांडणीवरून. मधोमध चारूकाकांचा फोटो आणि आजूबाजूला आप्त-स्वकियांची बैठक व्यवस्था. चारूकाकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मंचावर सामाजिक, सांस्कृतिक तसेच राजकीय क्षेत्रातील महनीय व्यक्ती तर होत्याच पण सभागृहही चारूकाकांच्या चाहत्यांनी खचाखच भरले होते.
मनीषा निश्चल यांनी उत्स्फूर्तपणे चारूकाकांच्या संदर्भातील कलाकारांची गीते सादर केली आणि सांकेतिक मानवंदना दिली.
ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर म्हणाले, मन:पूर्वकता, निखळता, निष्ठा, सचोटी यांचा त्यांच्यात समन्वय दिसून येत असे. तेच गुण त्यांची मुले अभय आणि किशोर यांच्यात दिसून येतात. चारूकाकांशी जवळीक साधणे सोपी गोष्ट नसायची. त्यांना कुणाकडूनही काहीही नको असायचे. मात्र निखळपणे वागा अशी त्यांची अपेक्षा असायची.
किशोर सरपोतदार म्हणाले, वडिलांच्या प्रत्येक कृतीतून आमच्यावर संस्कार होत गेले. त्यांचे विचार किती वेगळे आहेत हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसायचे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत असल्याने प्रत्येक प्रांतात आपल्याला यश मिळत आहे.
प्रतिभाताई शाहू मोडक म्हणाल्या, वक्तशीरपणा हा चारूकाकांचा स्थायीभाव होता. कडक शिस्तीचे असले तरी ते भावनाशील होते. उल्हास पवार म्हणाले, चारूकाका म्हणजे उदार व्यक्तिमत्त्व. वैचारिक बैठक वेगळी असली तरी मदतीचा हात देताना त्यांनी कधी जात-पात-पंथ पाहिला नाही. त्यांच्याठायी असलेला प्रेमाचा ओलावा कधी न संपणारा होता.
आशा काळे म्हणाल्या, काकांचा जन्म अक्षयतृतीयेचा. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी अनेकांना अक्षय मदत केली. नाटक, चित्रपट क्षेत्रातील वाटचाल काकांमुळेच सुरू झाली आणि जोडीदारही काकांमुळेच मिळाला. डॉ. सतीश देसाई म्हणाले, श्रीमंती काय असते हे आज चारूकाकांच्या चाहत्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. त्यांची देहबोली जरी वेगळी असली तरी ते मनाने प्रेमळ होते.
चारूकाकांनी खानावळीला अन्नब्रह्माचे रूप दिले असे सांगून डॉ. न. म. जोशी म्हणाले, कौतुकाचा, मदतीचा हात आणि चुकला तर रट्टा असे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य होते. रामदास फुटाणे म्हणाले, त्यांच्याशी वाद घालतानाही मजा येत असे. दादा कोंडके यांच्यामुळे चारूकाकांशी भेट झाली. संकटात मदतीला धावून जाणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
लीला गांधी, अकुंश काकडे, मोहन जोशी, आनंद माडगूळकर, डॉ. माधवी वैद्य, ॲड.जे. जे. कुलकर्णी, आनंद सराफ, सुनील महाजन आदींनी चारूकाकांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले.
चारूकाकांशी निगडित आणि त्यांच्या सहवासात आलेल्या लोकप्रिय कलाकारांवर आधारित गाजलेली चित्रपट गीते कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मनिषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी सादर केली.
–—————————————–
जाहिरात
जाहिरात