स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे दि. 21 मे रोजी ‘सावरकर दौड’चे आयोजन !
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताहाचा पुण्यातून होणार प्रारंभ !
पुणे : स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विवेक व्यासपीठ यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. 21 मे 2023 रोजी ‘सावरकर दौड’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात आयोजित करण्यात आलेल्या सावरकर जयंती सप्ताहाला ‘सावरकर दौड’ने पुण्यात प्रारंभ होणार आहे.
पत्रकार परिषदेस कसबा विभाग पुणेच्या महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुलकर्णी, सचिव कृष्णा वैद्य, पुणे शहर चिटणीस विक्रम दिवाण, पुणे शहर संपर्क प्रमुख श्रीराम जोशी, वारजे विभाग प्रमुख यज्ञेश गांधलीकर, पिंपळे गुरव विभाग प्रमुख शुभम कातंगळे, विशाल कुलकर्णी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त राज्य सरकाराने महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक, सामाजिक तसेच सामूहिक कार्यक्रमांचे नियोजन करून सावरकर सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
याच अनुषंगाने पुण्यात ‘सावरकर दौड’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘सावरकर दौड’चा प्रारंभ सकाळी 7:30 वाजता फर्ग्युसन महाविद्यालय येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून होणार असून “ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)” युद्ध सेवा मेडलने सन्मानित, ज्येष्ठ सेनाधिकारी आणि “सुप्रसिद्ध सिने अभिनेते सौरभ गोखले” यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. ही दौड फर्ग्युसन महाविद्यालय – ज्ञानेश्वर पादुका चौक – मॉडर्न महाविद्यालय – बालगंधर्व – डेक्कन जिमखानामार्गे जाणार असून सावरकर अध्यासन केंद्रात या ‘सावरकर दौड’चा समारोप होणार आहे.
या दौडमध्ये सर्व वयोगटातील 500 पेक्षा अधिक स्त्री-पुरुष सहभागी होणार असून सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही सहभाग असणार आहे.
कर्वे रस्त्यावरील सौ. विमलाबाई गरवारे विद्यालयासमोरील सावरकर अध्यासन केंद्र येथे ‘सावरकर दौड’चा समारोप होणार असून ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांचे ‘सावरकर आणि सैनिकीकरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी (दि. 28 मे) सकाळी 9 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शक डॉ. शुभा साठे यांचे ‘महाविद्यालयीन सावरकर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
जास्तीतजास्त सावरकरप्रेमींनी ‘सावरकर दौड’मध्ये सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म भरून सहभाग नोंदवावा आणि सावरकर जयंती सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीनिवास कुलकर्णी (9561491625), अश्विनी कुलकर्णी (9850409041) आणि कृष्णा वैद्य (9420787048) यांच्याशी संपर्क साधावा.
गुगल फॉर्म लिंक : https://forms.gle/Wk5dhxG7temXgb8q8
जाहिरात
जाहिरात