गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवन गौरव पुरस्काराने अंजली कुलकर्णी सन्मानित !!
मुक्तछंदात शब्दमाधुर्य, आशयाकडे कविंचे दुर्लक्ष : प्रा. मिलिंद जोशी !
अंजली कुलकर्णी यांच्या कविता समाजभान जपणाऱ्या शुद्ध प्रतिच्या : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : आजची मराठी कविता इझमच्या जोखडातून मुक्त झाली असली तरी मुक्तछंदाचा वापर करताना भाषा, शब्दमाधुर्य, लय, आशय आणि भावोत्कटता याकडे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केली.
जागतिकीकरणाच्या रेट्यात अडकलेली समाजव्यवस्थेतील नाती, भावना, बदलती मूल्ये यांचे मार्मिक चित्रण टिपणारी कवयित्री म्हणून अंजली कुलकर्णी यांची ओळख असून त्यांनी निर्हेतूक मनाने लिहिलेल्या कविता संवेदनशील, समाजभान जपणाऱ्या, शुद्ध प्रतिच्या आहेत, असे त्यांनी गौरवोद्गार नमूद केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा काव्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत संगत-प्रतिष्ठान आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, अंजली कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, मैथिली आडकर.
अंजली कुलकर्णी यांची कविता अंत:स्वर जपणारी आहे, असे नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, कवितेला स्वतःचे म्हणून रूप असते. परंतु परिच्छेदामागून परिच्छेद उतरवून काढले की, कविता तयार झाली असे आज अनेक कवींना वाटते. गद्य आणि पद्य यातील भेद कवींनी लक्षात घ्यायला हवा, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
आडकर दाम्पत्याचे काम सामाजिक गुणवत्तेचा शोध घेणारे आहे, अशा शब्दांत प्रा. मिलिंद जोशी यांनी रंगत-संगत प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले.
ॲड. प्रमोद आडकर यांनी स्वागतपर प्रास्ताविकात संस्थांच्या उपक्रमांची माहिती देऊन पुरस्कारामागील भूमिका विशद केली.
सत्काराला उत्तर देताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, ज्ञानलालसा लाभलेल्या कुटुंबात जन्म झाल्यामुळे मी अभ्यास, वाचन, शिक्षण या संस्कारातच वाढले. त्यातूनच कविता करण्याची आवड निर्माण झाली. शाळा व महाविद्यालयीन काळात पोषक वातावरण मिळाल्यामुळे चांगली कविता लिहिली जावी हा ध्यास लागला.
याच काळात स्त्रीवादी चळवळीशी जोडले गेल्याने जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करत माझ्याकडून स्त्रीसंवादी काव्याची निर्मिती झाली. कवितेने मला समाजात ओळख निर्माण करून दिली तसेच स्वत्वाची आत्मशोधी प्रक्रियाही शिकविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी तर मानपत्राचे वाचन ऋचा कर्वे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित कविसंमेलनात विजय सातपुते, सुजित कदम, स्वप्नील पोरे, मिलिंद शेंडे, राजश्री सोले, राजश्री महाजनी, स्वाती दाढे, मीना सातपुते, स्वाती यादव, माया मुळे, डॉ. मृणालिनी गायकवाड, आशा ठिपसे, डॉ. रेखा देशमुख, वैजयंती विझें-आपटे यांचा सहभाग होता. ज्येष्ठ कवयित्री प्रभा सोनवणे अध्यक्षस्थानी होत्या. केतकी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.