गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : वारकरी संप्रदायातील समता, बंधुता व मानवता या मूल्यांना केंद्रस्थानी मानून कार्यरत बंधू-भगिनींना संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा संत चोखामेळा समता पुरस्कार मंगळवेढा येथील प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांना जाहीर करण्यात आला आहे.
फोटो : प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी
संत चोखामेळा यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार ह. भ. प. सुभद्रामाय खरात यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
ह. भ. प. सुभद्रामाय खरात
पुरस्कार वितरण संत चोखामेळा महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यादिनी, बुधवार, दि. 17 मे 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतील भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या हस्ते आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माणिक सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर, श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्षा प्राचार्या उल्का धावारे-चंदनशिवे यांनी निवेदनाद्वारे दिली.
प्राचार्य पुजारी यांनी संत चोखामेळा महाराज व परिवार तसेच संत कान्होपात्रा यांच्या साहित्य जीवन कार्यामध्ये केलेल्या संशोधन कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
संत चोखामेळा यांची जन्मभूमी असलेल्या मेहुणाराजा (जि. बुलडाणा) येथे पुण्यतिथी सप्ताहाची सुरुवात केलेल्या, संत चोखामेळा महाराज व त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या विचार व साहित्याच्या प्रचार कार्याबद्दल ह. भ. प. सुभद्रामाय खरात यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
चंद्रभागेच्या तिरी श्री विठ्ठलाच्या अस्तित्वाला केंद्र मानून अठरापगड जातींना एकत्र करणारा ‘महासमन्वय’ म्हणजे वारकरी संप्रदाय. त्याची मुळे बहुजनांच्या आध्यात्मिक हिताच्या मानवीय व्यवहारात गुंतलेली आहेत. समाजात बंधुभाव अन् सामाजिक एकता प्रस्थापित करावयाची असेल तर, वारकरी संप्रदाय हेच एकमेव अधिष्ठान आहे. एकसंध समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्व भारतीय एक आहोत. हा विचार घेऊ सामाजिक एकतेसाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजासमोर घेऊन जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ‘संत चोखामेळा समता पुरस्कार’ होय.
वारकरी संतांनी सांगितलेल्या मार्गाने जनसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे गढून गेलेल्या व्यक्तीमत्वाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या उल्का धावारे-चंदनशिवे आणि संत चोखामेळा समता पुरस्कार निवड समितीचे विश्वस्त प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले.
——————————————-
जाहिरात
जाहिरात