गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ सैनिकांच्या सुरात सूर मिसळत मैत्रीचा धागा केला दृढ.
द क्विन मेरी टेक्निकल इस्टिट्यूटमध्ये रंगली अनोखी मैफल !
पुणे : ‘श्री रामचंद्र कृपालू भज मन’ या भजनाने सुरवात झालेल्या ‘गीतमाला’ने देशभक्ती, प्रेम, विरह, मैत्री अशा विविध भावछटा दाखविणाऱ्या चित्रपट गीतांनी सैनिकांची सायंकाळ संस्मरणीय तर ठरलीच त्याच बरोबरीने ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ या गीताने सैनिक आणि सामान्य नागरिक यांच्यातील मैत्रीचा धागा अधिक दृढ झाला.
‘विकलांगता से सक्षमता’ या ब्रीद वाक्याला अनुलक्षून अपंग सैनिकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या पुण्यातील द क्विन मेरी टेक्निकल इस्टिट्यूटमध्ये ही अनोखी मैफल रंगली.
कर्नल वसंत बल्लेवार, कर्नल राहुल बाली तसेच उद्योजक कुमार डंके यांनी हेवन ट्यून्स एन्टरटेन्मेंट आणि कायझेन मीडिया यांच्या सहकार्याने या मैफलीचे आयोजन केले होते.
प्रणव तडवळकर, सावनी सावरकर, कुमार डंके, डॉ. पूर्वा डंके, कुणाल डंके, धनश्री डंके यांनी गीते सादर केली.
डंके कुटुंबिय विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी संगीताची आवड जोपासली आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी या मैफलीच्या आयोजनात त्यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सैनिक पत्नी असलेल्या व भरतनाट्यम् नृत्यांगना, संगीतकार तापसी देवनाथ आणि हॉबी सेंटरमधील विद्यार्थिनींनी ‘वंदेमातरम्’ या गीतावर नृत्य सादर केले.
त्यानंतर सुरू झाला तो ‘गीतमाला’ या हिंदी चित्रपट गीतांचा सुरेल प्रवास. प्रणव तडवळकर आणि सावनी सावरकर यांनी सुरुवातीस ‘श्री रामचंद्र कृपालू भज मन’ हे भजन सादर केले. ‘विश्व मे गुंजे हमारी भारती’ या गीताला सैनिक बांधव व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात साथ दिली व संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावाने भारित झाले.
‘ए जिंदगी गले लगा ले’ या गीताने जीवनावर प्रेम करण्याची जिद्द जवानांमध्ये जागविली तर ‘दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके’ या प्रेमगीताला मनपसंत दाद दिली.
‘तेरे बिना जिया जाये ना’, ‘चुपके से लगजा गले रात की चादर तले’ या गीतांनी उपस्थितांच्या मनात एक अनामिक हुरहुर निर्माण केली. प्रणव आणि सावनी यांनी एकत्रितपणे सादर केलेले ‘तु मिले दिल खिले’ हे गाणे श्रोत्यांना विशेष भावले.
कुमार डंके यांनी ‘मेरा चाँद मुझे आता है नजर’, ‘सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही’, ‘नदिया से दरिया’ ही गीते प्रभावीपणे सादर केली. तर कुणाल डंके यांनी गायलेल्या ‘किस मोड पे आयी आशिकी’ या गीताला विशेष दाद मिळाली. डॉ. पूर्वा डंके यांनी आपल्या सुमधुर आवाजात ‘तिनका तिनका जरा जरा है रोशनी’ आणि धनश्री डंके यांच्यासह ‘मोह मोह के धागे’ ही गीते सादर केली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते जवान देवाशिष बंनिक यांनी त्यांच्या सहकारी आणि गायकांसह सादर केलेले ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ हे गीत. त्यानंतर जवान राजेंद्र माने यांच्या ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तु’ या गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाची सांगता प्रणव तडवळकर आणि सावनी सावरकर यांनी सादर केलेल्या ‘दिवाना हुआ बादल’ या गीताने झाली.
शिल्पा देशपांडे यांनी ओघवत्या वाणीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
द क्विन मेरी टेक्निकल इस्टिट्यूटमार्फत आजपर्यंत बारा हजार 800 सैनिकांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याची माहिती कर्नल वसंत बल्लेवार यांनी दिली. संस्थेच्या वतीने त्यांनी सर्व कलाकारांचा सत्कार सैनिकांची आई यशोधरा पवार लिखित ‘शहादतें’ हे पुस्तक भेट देऊन केला.
डॉ. कर्नल संजय बोरसे आणि डॉ. प्रमोद वऱ्हाडे यांची विशेष उपस्थिती होती.
जाहिरात
जाहिरात