गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती संगीत समारोह रसिकांसाठी ठरला पर्वणी !!
गायन, वादन, नृत्याच्या त्रिवेणी संगमातून रंगला रौप्य महोत्सवी वि. वि. द. स्मृती समारोह !
पुणे : शहनाईची परंपरा जोपासणाऱ्या गायकवाड कुटुंबातील युवा कलावंत नम्रता गायकवाड हिच्या सुरेल शहनाई वादनाने सुरू झालेल्या वि. वि. द. स्मृती संगीत समारोहात गायत्री जोशी, आदित्य मोडक, जयंत केजकर, रमाकांत गायकवाड, आदित्य खांडवे यांचे सुमधुर गायन झाले.
तर अभिषेक शिनकर यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने आणि अभिषेक बोरकर यांच्या प्रभावी सरोद वादनाने मैफलीची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. ओजस अढीया यांच्या दमदार तबला वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले तसेच अनन्या गोवित्रीकर यांनी विलोभनीय कथक नृत्यप्रस्तुती सादर केली तर शाकीर खान यांचे बहारदार सतारवादन समारोहाचा कळसाध्याय ठरले.
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. दत्तात्रय विष्णु पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवारी (दि. 8) वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाच्या रौप्य महोत्सवी (25वा) समारोहाची ‘भैरव ते भैरवी’ अशी संकल्पना होती. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या समारोहाची सांगता रात्री 10 वाजता झाली. गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णु विनायक स्वरमंदिरात या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सीजीएसटीचे आयुक्त डॉ. रवींद्र डांगे, सीजीएसटीचे आयुक्त दिनेश भोयर, कस्टम विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समारोहाची सुरुवात सुप्रसिद्ध शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांची ज्येष्ठ कन्या नम्रता गायकवाड यांनी अहिर भैरव राग सादर करून केली. अतिशय दमसास आवश्यक असणाऱ्या या सौंदर्यपूर्ण सुरेल वादनाला किशोर कोरडे यांनी तबला साथ केली तर केदार जाधव यांनी वादन साथ केली.
अनवट रागांवर प्रभुत्व असणाऱ्या गायत्री जोशी यांनी राग ललतने मैफलीस सुरवात केली. त्यानंतर भटियार राग सादर केला. त्यांना अभिनय रवंदे (संवादिनी), आशय कुलकर्णी (तबला) समर्पक साथ केली. संवादिनीवर राग नटभैरव सौंदर्य उलगडून अभिषेक शिनकर यांनी रसिकांची वाहवा मिळविली.
आशय कुलकर्णी (तबला) यांनी साथसंगत केली. पहिल्या सत्राची सांगता आदित्य मोडक यांनी गौड सारंग राग तसेच देसी रागातील विलंबित तिलवाडातील रचनेने केली. आदित्य मोडक यांचा खुला आवाज, बहारदार तानांनेी मैफलील सुरेख रंग भरले. त्यांना रोहित मुजुमदार (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी) यांनी सुरेल साथ केली.
दुसऱ्या सत्राची सुरुवात जयंत केजकर यांनी खुलविलेल्या राग शुद्ध सारंगने झाली. यानंतर त्यांनी राग गावतीमध्ये एक रचना सादर करून समारोहात आपले स्वरपुष्प अर्पण केले. अभिजित बारटक्के (तबला) तर स्वानंद कुलकर्णी (संवादिनी) यांची उत्तम साथ लाभली.
सुमधुर पण आर्त अशा सूरांनी युवा सरोद वादक अभिषेक बोरकर यांनी सरोदचे सूर छेडत राग चारूकेशीमधील विलंबित तीन ताल, रूपक आणि द्रुत ताल सादर करून सरोद या अनवट वाद्य वादनावरील आपली हुकुमत दाखवून दिली. दुसऱ्या सत्राची सांगता ओजस अढीया यांच्या दमदार तबला वादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीनताल सादर केला.
गुरू मृदंगराज आणि उस्ताद अल्लारखाँ खान यांच्या रचना त्यांनी प्रभावीपणे सादर केल्या तसेच अजराडा घराण्याच्या वादन शैलीचे सौंदर्यही आपल्या वादनातून उलगडले. रसिकांनी त्यांच्या वादनास टाळ्याच्या गजरात दाद दिली.
युवा कलाकारांनी सादर केलेल्या या संगीतातील त्रिवाधांचे सादरीकरण ऐकून आणि पाहून रसिक नुसतेच मंत्रमुग्ध नव्हे तर विस्मयचकीतही झाले.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र डांगे यांनी गांधर्व महाविद्यालय आणि पंडित प्रमोद मराठे यांनी आयोजित केलेल्या समारोहाचे कौतुक केले. अंतर्मनाशी संवाद करत जगण्याची कला म्हणजेच भारतीय शास्त्रीय संगीत होय, असे सांगून डांगे म्हणाले, अभिजात संगीत परंपरेचा वारसा जपत त्याला प्रवाहित ठेवले गेले आहे.
दिनेश भोयर म्हणाले, समारोहाच्या माध्यमातून विलक्षण प्रतिभा असलेल्या कलाकारांना ऐकण्याची संधी मिळाली याचा विशेष आनंद आहे. भारतीय शास्त्रीय संगीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात गांधर्व महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गारही काढले.
मान्यवरांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केले. समारोहाच्या उद्घाटनप्रसंगी रवींद्र आपटे, डॉ. मोहन उचगांवकर, वसंतराव पलुस्कर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन निरजा आपटे, मंजिरी जोशी आणि मंजिरी धामणकर यांनी केले.