गोल्डन आय न्यूज नेटवर्क
संविधानाच्या शिकवणुकीचा ॲड. प्रमोद आडकर यांच्याकडून जागर : डॉ. श्रीपाल सबनीस !!
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे कृतज्ञता सन्मान व रमाई रत्न पुरस्काराने गौरव !
पुणे : आजच्या काळात एका जातीचा-धर्माचा झेंडा घेऊन राजकारण, समाजकारण होत असताना ॲड. प्रमोद आडकर यांनी सर्व धर्मांच्या चांगुलपणाचा झेंडा खांद्यावर घेऊन सत्याच्या बेरजेतून आयुष्य उभे केले आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
ॲड. आडकर रमाई महोत्सवाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून संविधानाच्या शिकवणुकीचा जागर करीत असल्याबद्दल त्यांचा रमाई रत्न पुरस्काराने करण्यात आलेला सन्मान अभिनंदनीय आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आयोजित कार्यक्रमात मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. श्रीपाल सबनीस, लता राजगुरू, विठ्ठल गायकवाड.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह, ज्येष्ठ संयोजक, लेखक, रंगत-संगत प्रतिष्ठान आणि रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या एकसष्टीनिमित्त कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आज (5) आयोजन करण्यात आले होते. ॲड. आडकर यांचा सन्मान डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
रमाई महोत्सवाचे सलग 12 वर्षे अध्यक्षपद भूषवित असल्याबद्दल त्यांचा या वेळी रमाई रत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, मैथिली आडकर, ॲड. अविनाश साळवे मंचावर होते.
संविधानाची प्रत, पंचशील शाल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
समाजासाठी सर्वस्व वाहून घेणाऱ्या सर्व स्तरातील, जातीधर्मातील स्त्री-पुरुषांच्या कार्याचा ॲड. आडकर सन्मान करीत आले आहेत. त्यांची ही कृती संस्कृतीची पुण्याई पेरणारी आहे, असे सांगून डॉ. सबनीस म्हणाले, आज राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणात विषाची पेरणी वाढलेली असताना संस्कृती जगणे अशक्य आहे.
अशा परिस्थितीत साहित्य, संस्कृती आणि समाजकारण क्षेत्रात संजीवनी देणारे, पुण्य पेरणारे कार्य त्यांच्या हातून होत आहे. ॲड. आडकर यांना समाजकार्यात सहकार्य करणाऱ्या मैथिली आडकर यांचेही त्यांनी कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. आडकर म्हणाले, विविध क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजासमोर आणण्याचा गेल्या 32 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. या कार्याकरीता माता रमाईचा आशीर्वाद आणि पत्नीची खंबिर साथ मला लाभली आहे. त्यामुळे व्रतस्थपणे अखंडित हे कार्य मी सुरू ठेवेन.
ॲड. अविनाश साळवे म्हणाले, सामाजिक जीवनात कार्यरत असताना स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करावे लागते. अशा वेळी ॲड. आडकर यांना पत्नीची खंबीर साथ लाभली असल्याने ते समाजाप्रबोधनाचे कार्य करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले. आभार लता राजगुरू यांनी मानले.