गोल्डन आय न्यूज नेटवर्क
डॉ. संजीवनी राहणे यांच्या लिखाणातून मानसशास्त्र उलगडत जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न : प्रसाद मिरासदार
झंकार स्टुडिओ पब्लिशिंगतर्फे ‘मोझॅक भाव-बंधाचे’ कथासंग्रह, ई-बुक आणि ऑडीओ बुकचे प्रकाशन
‘मोझॅक भाव-बंधाचे’ या कथासंग्रह, ई-बुक आणि ऑडीओ बुकच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. संजीवनी राहणे, सत्यजीत पंगू, प्रसाद मिरासदार, डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी.
पुणे : मानसशास्त्र उलगडत लोकांच्या मनाचा आणि जीवनाचा अर्थ शोधत; भावबंध सांधण्याच्या प्रक्रियेतून जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा भाव डॉ. संजीवनी राहणे यांच्या लेखनातून दिसून येतो, असे प्रतिपादन स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार यांनी केले. ऑडिओ, ई आणि मुद्रित स्वरूपात पुस्तक एकाचवेळी प्रकाशित होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
झंकार स्टुडिओ पब्लिशिंगतर्फे डॉ. संजीवनी राहणे लिखित ‘मोझॅक भाव-बंधाचे’ या कथासंग्रह, ई-बुक आणि ऑडीओ बुकचे प्रकाशन हॉटेल ॲम्बियन्स येथे मिरासदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी मिरासदार बोलत होते. डॉ. संजीवनी राहणे यांच्यासह झंकार स्टुडिओ पब्लिशिंगचे सत्यजित पंगू, अमृता कुलकर्णी, स्वाती डोंगरे व्यासपीठावर होते.
मिरासदार पुढे म्हणाले, कथासंग्रहातील कथा सकारात्मकतेच्या सूत्रात बांधल्या गेल्या असल्यामुळे त्या वाचण्यापलिकडे जाऊन अनुभवल्या पाहिजेत.
आपल्या आयुष्यात ज्या प्रमाणे नकारात्मक घटनांचे भावविश्व निर्माण होते त्याच प्रमाणे सकारात्मक घटनांचेही भावविश्व निर्माण होते. जीवनात नकारात्मक नाही तर सकारात्मकतेचा शोध घेतला पाहिजे या मानसशास्त्रावर आधारित कथांची मांडणी केली आहे. वयाच्या ठराविक टप्प्यानंतर आयुष्यात जाणविणाऱ्या पोकळीतून एकट्याचा आनंददायी प्रवास या लिखाणातून जाणवतो, असे निरिक्षण त्यांनी नोंदविले.
डॉ. झुंजारराव म्हणाले, लेखिकेने संवेदनशीलतेतून केलेल्या निरीक्षणांमधून कथांची निर्माती झाली असून समाजात सकारात्मकता पसरावी या उद्देशाने लिखाण केल्याचे जाणवते. ‘तोल’ आणि ‘प्रतिबिंब’ या कथांवर आधरित कविता डॉ. झुंजारराव यांनी सादर केल्या.
डॉ. संजीवनी राहणे यांच्या लिखाणाचा प्रवास मुलाखतीच्या रूपाने उलगडला. मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे माणसे वाचायला शिकले तसेच आजूबाजूच्या प्रसंगांमधून कथेचे बीज रुजत गेले. वास्तवता आणि कल्पनाशक्तीच्या जोडीने कथेचा गाभा पुढे नेत गेल्याचे डॉ. राहणे म्हणाल्या. भविष्यात पुरुषकेंद्री आणि विनोदी कथा लिहायचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
डॉ. राहणे यांच्याशी स्वाती डोंगरे यांनी संवाद साधला.
प्रास्ताविकात सत्यजीत पंगू यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रत्येकाने व्यक्त होत आपल्या कथांना योग्य माध्यम उपलब्ध करून दिले तर कथांचे ग्रंथालय निर्माण होईल आणि आजच्या युवा पिढीला ते मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले.
कथांविषयी अमृता कुलकर्णी व स्वाती डोंगरे यांनी विवेचन केले. ‘निरागसता ते नितिमत्ता’ या कथेचे अभिवाचन विशाखा बेळे यांनी केले.
मान्यवरांचे स्वागत कैलास राहणे, सूत्रसंचालन अमृता कुलकर्णी यांनी केले तर आभार स्वाती डोंगरे यांनी मानले.
फोटो ओळ : ‘मोझॅक भाव-बंधाचे’ या कथासंग्रह, ई-बुक आणि ऑडीओ बुकच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. संजीवनी राहणे, सत्यजीत पंगू, प्रसाद मिरासदार, डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी.
जाहिरात
जाहिरात