गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्रद्धा शिक्षणाच्या आड येता कामा नये : आमदार भीमराव तापकीर
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या ‘जीर्णोद्धार’द्वारे वास्तवतेचे दर्शन !
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या पालक पुरस्काराने नम्रता आणि नंदकुमार पारसनीस तसेच अस्मिता इंदलकर यांचा सन्मान!
पुणे : ‘जीर्णोद्धार’ नाटिकेद्वारे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भातील वास्तव मांडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण सुविधा चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. देव-मंदिराला समाजात फार महत्व आहे; पण श्रद्धा ही शिक्षणाच्या आड येता कामा नये, असे प्रतिपादन आमदार भीमराव तापकीर यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीच्या ‘जीर्णोद्धार’ या बालनाट्यातील आणि ‘वार्ता वार्ता वाढे’ या दोन अंकी नाटकातील कलाकारांचा गौरव समारंभ भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. कलाकारांचा गौरव आमदार भीमराव तापकीर आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी आमदार तापकीर बोलत होते.
याच कार्यक्रमात युवा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या आई अस्मिता इंदलकर आणि युवा अभिनेता, दिग्दर्शक सूरज पारसनीस याचे पालक नम्रता आणि नंदकुमार पारसनीस यांचा पालक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सुरुवातीस ‘जीर्णोद्धार’ आणि ‘येरे येरे पावसा’ या बालनाट्यांचे सादरीकरण झाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त दिपाली निरगुरडकर, संध्या कुलकर्णी व्यासपीठावर होते.
कुटुंबातील व्यक्तींकडून मुलांवर जे संस्कार केले जातात तेच टिकतात असे सांगून आमदार तापकीर म्हणाले, जीवनातील वाटचालीसाठी कला ही खूप महत्वाची असते. नाट्यसंस्कार कला अकादमीच्या माध्यमातून प्रकाश पारखी जे कार्य करीत आहे ते अभिनंदनीय आहे.
मेघराज राजेभोसले म्हणाले, रंगभूमीवर काम करून पाया पक्का झाला असेल तर अभिनयाच्या कुठल्याही माध्यमात यश मिळू शकते. अभिनयाशिवाय कलांमधील तांत्रिक क्षेत्रातही अनेक संधी आहेत. चित्रपट-मालिकांमध्ये काम देतो असे सांगून जाहिराती केल्या जातात अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे बाल कलाकारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.
सूरज याच्यावर नाट्यकलेचे जे संस्कार झाले आहेत ते पारखी सर यांच्यामुळेच झाले आहेत. मुलामुळे आमचा सत्कार होत आहे त्या बद्दल मुलाप्रती पालक म्हणून कृतज्ञ आहे, अशी भावना नंदकुमार पारसनीस यांनी व्यक्त केली. कलेच्या क्षेत्रात मुलांना प्रोत्साहन द्या, असे आवाहन अस्मिता इंदलकर यांनी केले.
सुरुवातीस प्रकाश पारखी यांनी नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वाटचालीचा आढावा घेतला संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
नाट्यसंस्कार कला अकादमी आणि ललित कला केंद्रतर्फे घेण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाची माहिती प्रा. अश्विनी आरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सायली पाटील यांनी केले तर आभार प्रकाश पारखी यांनी मानले.
जाहिरात
जाहिरात