मालिका लिखाणासाठी अभ्यास हा लागतोच : मुग्धा गोडबोले-रानडे
पुण्यातील युवा पिढीमध्ये कष्ट घेण्याच्या वृत्तीचा अभाव !
विपुलश्री मासिकाचा 24वा वर्धापन दिन साजरा : रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण : वासंतिक अंकाचे प्रकाशन
विपुलश्री वासंतिक अंकाचे प्रकाशन करताना नीलिमा बोरवणकर, माधुरी वैद्य, मुग्धा गोडबोले-रानडे, डॉ. ज्योत्स्ना आफळे.
पुणे : मालिका लेखन करणाऱ्यांना साहित्यिकाप्रमाणे योग्य तो मान दिला जात नाही, या लेखनाला साहित्यकृती मानले जात नाही हे शंभर टक्के मान्य आहे. मात्र मालिकेतील एक भाग लिहिल्यानंतर जे समाधान मिळते ते शब्दात सांगता येण्यासारखे नाही.
दूरचित्रवाहिन्या हे लोकाभिमुख माध्यम आहे. मालिकांचे लिखाण करण्यासाठी अभ्यास हा लागतोच, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे यांनी केले.
मालिकांमध्ये काम मिळविण्यासाठी मुंबईतील मराठी-अमराठी तरुणांमध्ये कष्ट करण्याची जशी वृत्ती दिसते तशी वृत्ती पुण्यातील युवा पिढीमध्ये दिसून येत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
संवाद : नीलिमा बोरवणकर आणि मुग्धा गोडबोले-रानडे.
विपुल वाचन, विपुल ज्ञान आणि विपुल रंजन या त्रिसूत्रीचा अवलंब करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या विपुलश्री मासिकाचा 24वा वर्धापन दिन सोहळा शैलेश सभागृह येथे आज (दि. 29) आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यात ‘संवादलेखन – कला की तंत्र’ या विषयावर गोडबोले अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. वासंतिक कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण व इतर पुरस्कारांचे वितरण तसेच वासंतिक अंकाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते या प्रसंगी झाले.
विपुलश्रीच्या संपादक माधुरी वैद्य, कथा लेखन स्पर्धेच्या परिक्षक डॉ. ज्योत्स्ना आफळे आणि नीलिमा बोरवणकर व्यासपीठावर होत्या.
मुंबईत गेल्यानंतर नट-नटी म्हणून यश मिळेल असे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, असे एका प्रश्नात सांगून मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, घरात उत्तम मराठी भाषा बोलली जात होती, भाषेचे सौंदर्य कानावर पडत होते, वाचनासाठी कुठल्याही विषयाचे बंधन नव्हते त्यामुळे अभिनेत्री म्हणून माझा विचार झाला. कलेसाठी कला एवढाच विचार न करता या क्षेत्रात व्यावसायिक भूमिकेतून मार्गक्रमण करीत राहिले. बाहेरच्या जगात वावरायचे असेल तर इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी लिखाण करण्यासाठी विचारांचे किती कंगोरे असातात हे सांगून संवाद, पटकथा लेखन कशा पद्धतीने केले जाते, त्यामागील विचार काय असतो याची माहिती दिली.
ओटीटी माध्यमात सेन्सॉरशिप नाही त्यामुळे कुटुंबाला एकत्रितपणे ओटीटीवरील मालिका बघता येतील असे नाही.
दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील काही व्यक्तिरेखा नकारात्मक असल्या तरी मालिकांमधून चांगुलपणाच दाखविला जातो असे गोडबोले-रानडे म्हणाल्या. मालिकांमध्ये नाट्य नसेल तर अशा मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, याची काही उदाहरणे त्यांनी दिली.
मुग्धा गोडबोले-रानडे यांच्याशी नीलिमा बोरवणकर यांनी संवाद साधला.
रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या विपुलश्रीच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी नवीन उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे माधुरी वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले. कथा लेखन स्पर्धेच्या परिक्षक डॉ. ज्योत्स्ना आफळे यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल –
वासंतिक कथास्पधेतील विजेते – कंसात कथेचे नाव : प्रथम : सुजित पुरोहित, सांगली (पेटंट), द्वितीय : चिंतामणी मुळे, डोंबिवली (साटम), तृतीय : हिमानी निलेश, ऑस्ट्रेलिया (निळाई), चतुर्थ : डॉ. संजीव कुलकर्णी, पुणे (चोर), पाचवे पारितोषिक : रेखा शिधोरे, मुबंई (वेगळ्या वाटेने चालताना), उत्तेजनार्थ : संतोष पाटील, कोल्हापूर (चांगभलं), शुभा नाईक, मुंबई (खिडकीतला बाबा), डॉ. अनुराधा थत्ते, पुणे (मायेची सावली), डॉ. आनंद पुरोहित, पुणे (मी आणि माझी प्रेयसी), तारा गोपीनाथ, बेंगळूरू (मिली).
विपुलश्रीमध्ये प्रसिद्ध झालेल्या साहित्यास दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
अर्चना अकलूजकर यांना ‘रूप-अरूप’ या कथेसाठी डॉ. शैला नवरे पारितोषिक, डॉ. शिरीन वळवडे यांच्या ‘वार्तालाप’ आणि डॉ. गौरी कानिटकर यांच्या ‘अनवट वाटेवरचे प्रवासी’ या दोन सदरांना कै. प्रभाकर वैशंपायन पुरस्कार विभागून देण्यात आला.
उत्कृष्ट ललित लेखांना दिला जाणारा विपुलश्री ललितबंध पुरस्कार मीना साठे यांच्या ‘पंढरीची वारी’ आणि माधुरी बनसोड यांच्या ‘संतसाहित्यातील गणेशभक्ती’ या दोन लेखांना विभागून देण्यात आला.
जाहिरात –
जाहिरात –