गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘जीर्णोद्धार’, ‘वार्ता वार्ता वाढे’तील नाट्यकलाकारांचा
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे शुक्रवारी गौरव !
विविध पुरस्कारांवर उमटविली आहे यशाची मोहोर : ‘जीर्णोद्धार’, ‘येरे येरे पावसा’
बालनाट्यांचे होणार विनामूल्य प्रयोग
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमीची निर्मिती असलेल्या ‘जीर्णोद्धार’ या बहुचर्चित बालनाट्याचे एका वर्षात 27 प्रयोग झाले असून विविध स्पर्धांमध्ये या बालनाट्याने नामवंत संस्थांचे पुरस्कार पटकाविले आहेत. तसेच ‘वार्ता वार्ता वाढे’ या दोन अंकी नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. या निमित्त या दोन्ही नाटकांमधील कलाकारांचा गौरव समारंभ शुक्रवार, दि. 28 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे होणार असून कलाकरांचा गौरव अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते होणार असून आमदार भीमराव तापकीर आणि माजी नगरसेवक धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गौरव सोहळ्यानिमित्त ‘जीर्णोद्धार’ आणि ‘येरे येरे पावसा’ ही बालनाट्ये सादर होणार आहेत. कार्यक्रम आणि बालनाट्य प्रयोगास सर्वांना प्रवेश खुला आहे.
संस्थेच्या विश्वस्त दिपाली निरगुडकर उपस्थित होत्या.
प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या त्रिसूत्रीचा अवलंब करून नाट्यसंस्कार कला अकादमीची 44 वर्षांपासून बालनाट्य क्षेत्रात वाटचाल सुरू आहे. सामाजिक आशय असलेल्या ‘जीर्णोद्धार’ या बालनाट्याचे लेखन संध्या कुलकर्णी यांनी केले असून दिग्दर्शन प्रसाद कुलकर्णी यांचे आहे. प्रकाशयोजना आणि ध्वनीसंयोजन प्रसाद कुलकर्णी, अभिजित इनामदार, शैलेश सातपुते यांचे तर नेपथ्य पुष्कर देशपांडे यांचे आहे.
राज्यनाट्य स्पर्धेत पुणे केंद्रावर तसेच डोंबिवली येथे आयोजित सई परांजपे करंकड स्पर्धेत ‘जीर्णोद्धार’ या नाटकाला दिग्दर्शनासह नेपथ्याचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. पु. ल. देशपांडे करंडक (मुंबई), कांकरिया करंडक (अहमदनगर), प्रकाश इनामदार करंडक (पुणे), बालनाट्य स्पर्धा (वाशी, नवी मुंबई), राज्य नाट्य स्पर्धा, अंतिम फेरी (सोलापूर), दाजीकाका करंडक (पुणे) आणि गंधार गौरव स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये लेखन, दिग्दर्शन, अभिनय तसेच तांत्रिक विभागासाठी असलेली पारितोषिकेही या नाटकाला मिळालेली आहेत.
‘जीर्णोद्धार’ ही सामाजिक विषयावरील नाटिका असल्याने त्याचे प्रयोग गणेशोत्सव, नवरात्र, कोजागिरी अशा उत्सवांबरोबरच पालखी मुक्कामी वारकऱ्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवलीपासून आनंदवन-चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात तसेच महाराष्ट्राबाहेर बेळगाव येथेपर्यंत नाट्यसंस्कार कला अकादमीचे बालकलाकार पोहोचले आहेत.
‘वार्ता वार्ता वाढे’ या दोन अंकी नाटकाचे पुण्यात अनेक प्रयोग झाले आहेत. या नाटकात नाट्यसंस्कार कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत या नाटकातील कलाकारांना दिग्दर्शन, अभिनयाची पारितोषिके मिळाली आहेत. या नाटकाचे लेखन ओंकार गोखले यांचे असून दिग्दर्शन सूरज पारसनीस यांचे आहे. गोखले आणि पारसनीस हे दोघेही नाट्यसंस्कार कला अकादमीचे विद्यार्थी आहेत.
पालक पुरस्कार
आयुष्यात वेगळी वाट निवडणाऱ्या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या आणि मुलांमधील कलागुणांना वाव देणाऱ्या पालकांचा दरवर्षी पालक पुरस्काराने संस्थेतर्फे सन्मान केला जातो.
या वर्षी हा पुरस्कार युवा अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या आई अस्मिता पाटील-इंदलकर आणि युवा अभिनेता, दिग्दर्शक सूरज पारसनीस याचे पालक नम्रता आणि नंदकुमार पारसनीस यांना प्रदान करण्यात येणार आहे.
जाहिरात
जाहिरात