ग्रंथालये फक्त पुस्तकांची देवाण घेवाण केंद्रे नाहीत तर ज्ञानकेंद्रे आहेत.
ग्रंथालये जनसामन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अभिवन कल्पना राबविणे आवश्यक.
ग्रंथालये आणि नवतंत्रज्ञानाचा समन्वय साधून वाचन संस्कृती जोपासली जावी.
ग्रंथालये सांस्कृतिक उर्जाकेंद्रे बनावित.
परिसंवादातील सूर :जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुणे नगर वाचन मंदिरात ‘ब्लॉक ते ब्लॉग’ उपक्रम
पुणे : ग्रंथालये केवळ पुस्तकांची देवाण घेवाण करण्याची जागा नाही तर ही ज्ञानकेंद्रे आहेत. मुले पुस्तके वाचत नाहीत या म्हणण्यात काही तथ्य नाही. मात्र बदलत्या तंत्रज्ञानानुसार ग्रंथालयांमध्ये आवश्यक बदल घडवून आणणे अपेक्षित आहे. ग्रंथालये ही केवळ अभिजन वर्गासाठी नसून तळागाळातील जनसामान्यांना ग्रंथालयांशी कशा पद्धतीने जोडता येईल यादृष्टीने अभिनव उपक्रम राबविले जावेत, असा सूर ‘पुस्तकांचे बदलते रूप आणि ग्रंथालयाचे स्थान’ या विषयावर आयोजित परिसंवाद आणि खुल्या चर्चासत्रात उमटला.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित परिसंवादात सहभागी संगीता पुराणिक, सुवर्णा जोगळेकर, प्रसाद भारदे, मृणालिनी वनारसे, डॉ. किरण कुलकर्णी, शिल्पा देशपांडे आणि डॉ. शांतश्री सेनगुप्ता
जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज (दि. 23) पुणे नगर वाचन मंदिर, कथा बाय स्नेहल बाकरे व झंकार पब्लिशिंग स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉक ते ब्लॉग’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत पुणे नगर वाचन मंदिर येथे या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, लेखिका मृणालिनी वनारसे, पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, लेखिका व पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यकारी सदस्य संगीता पुराणिक, माध्यम तज्ज्ञ शिल्पा देशपांडे, मॉडर्न महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. शांतश्री सेनगुप्ता यांचा सहभाग होता.
पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे, झंकार स्टुडिओचे सत्यजित पंगूं यांनी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
कार्यक्रमास पुस्तकप्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. ग्रंथालयांसाठी असलेल्या शासकीय योजनांची आणि उपक्रमांची माहिती देऊन डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले, ग्रंथालये केवळ अभिजन वर्गासाठी संकुचित न राहता तळगाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. पुस्तकाच्या बदलत्या रूपाची ग्रंथालयांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, लेखकाने वाचकाला वाचनासाठी उद्युक्त करणे गरजेचे आहे. ग्रंथालये आणि ग्रंथपाल हे समाजातील महत्त्वाचे घटक असल्याने ते अद्ययावत असणे आवश्यक असून ग्रंथालये ही त्या त्या परिसारातील सांस्कृतिक उर्जाकेंद्रे बनावित अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मृणालिनी वनारसे म्हणाल्या, बदलत्या काळानुसार नवतंत्रज्ञान दाखल झाले आहे. पुढची पिढी या तंत्रज्ञानाच्या वापरातून पुस्तकांकडे, वाचनाकडे वळवता यावीत या करिता पुस्तके विविध रूपात वाचकांच्या हाती आली पाहिजेत.
वाचन संस्कृती अबाधित राहण्यासाठी ग्रंथालयांनी बदलत्या काळातील तंत्रज्ञान आत्मसात करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी आग्रही प्रतिपादन केले.
समाज माध्यमांमध्ये होत असलेल्या लिखाणाचा संदर्भ देऊन शिल्पा देशपांडे म्हणाल्या, निर्मिती आणि आस्वादन या दोन प्रक्रियेत उसंत असणे आवश्यक आहे.
सोशल मीडियात लेखक हाच प्रकाशक असल्याने लिखाणाची प्रमाणबद्धता, शुद्धलेखन, दर्जा आणि मूल्य या गोष्टी तपासणे गरजेचे आहे. मुलांनी काय वाचावे यासाठी पालकांनी दबाव टाकू नये अशी अपेक्षा व्यक्त करून मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांना जे आवडेल ते वाचायला प्रवृत्त करावे. एखाद्या लिखाणाविषयी अभिप्राय देताना घाई करू नये, तो सकस असावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. वाचकांची अभिरुची वाढविण्यासाठी सकस साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शांतश्री सेनगुप्ता म्हणाल्या, एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळविण्यासाठी अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून ग्रंथालयांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारत सुधारणा करणे आवश्यक आहे. लहान वयापासूनच विविध साहित्यकृती उपलब्ध करून देऊन मुलांना ग्रंथालयाशी जोडले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाचन संस्कृती कशी सुरू राहिल या दृष्टीने ग्रंथालयांनी मार्गक्रमण करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संगीता पुराणिक म्हणाल्या, पुढील पिढीला वाचनालयांकडे वळविणे गरजेचे आहे, त्यासाठी तंत्रज्ञानाची जरूर मदत घ्यावी परंतु ग्रंथालयातून त्यांना पुस्तकांचा अनुभव देणे आवश्यक आहे. ग्रंथालये आणि वाचनासाठी वापरात येऊ घातलेली विविध माध्यमे यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. वाचकांचे अभिप्राय, प्रतिक्रिया या लेखकाला नव्याने विचार करायला लावतात त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत.
स्वाती तडफळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाशक, वाचक आणि लेखक यांच्यात समन्वय साधला जावा, अशी अपेक्षा वाचकांकडून व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समन्वय प्रसाद भारदे यांनी केले. आभार पुणे नगर वाचन मंदिराच्या कार्यवाह सुवर्णा जोगळेकर यांनी मानले.
जाहिरात –
जाहिरात –