‘विरोधाची हद्द झाली सैन्यालाही भोवळ आली, पुरावे द्या-पुरावे द्या नाही तर माघार घ्या’ …
‘शब्द-सुरांच्या काठावर’ मैफलीत राजकीय भाष्य करणाऱ्या अर्थपूर्ण रॅप साँगचा बोलबाला….
राजेश दातार यांच्या ‘डौल मोराच्या मान चा’ला रसिकांची वन्स मोअरने दाद.
पुणे : जुन्या-नव्या परिचित-अपरिचित गाण्यांचा हात हाती घेऊन कवितांच्या दुनियेतील अनोखी सफर पुणेकर रसिकांनी अनुभवली ती ‘शब्द-सुरांच्या काठावर’ या मैफलीतून.
गझल, निसर्गगीत, प्रेमगीत अन् हास्याची लकेर उमटवित विचार करायला लावणारे विडंबन काव्य या मैफलीत तर होतेच पण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे ‘राजकारण..
फक्त राजकारण, जिथे-तिथे बघु तिथे-तिथे सुरू आहे बस राजकारण’ या रॅप साँगचे शब्द रसिकांच्या काळजाला स्पर्श करणारे ठरले.
आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, कवी मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शांताबाई या प्रतिभावान शब्दप्रभूंच्या तसेच रेश्मा कारखानीस यांनी रचलेल्या रचनांसह गप्पा-गाण्यांची अनोखी मैफल आज सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
शुभारंभाच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली. अजरामर गीतांसह नव्या कोऱ्या रचना, लोभसवाण्या कविता अन् त्या मागील कहाण्या असे मैफलीचे स्वरूप होते. काव्य-गीतांची मैफल कवयित्री रेश्मा कारखानीस आणि गायक राजेश दातार यांनी सादर केली.
अमित जोशी (तबला), कुमार करंदीकर (हार्मोनियम), राहुल श्रीवास्तव (गिटार), रोहित कुलकर्णी (की बोर्ड) यांनी साथसंगत केली.
‘कविते ये ना जवळ जराशी प्रेम तुझ्यावर करतो मी’ या गीताने मैफलीची सुरुवात झाली. ‘नभात एक एकटे झुरेल आज चांदणे’, ‘हट्ट तुझा हा कसा साजणा’, ‘कुणी तरी फेसबुकवर पोस्ट केलं परवा, सर्वगुणसंपन्न बायको असते केवळ अफवा’, ‘कधी कधी वाटते चुकीचे’, ‘मी आणि पाऊस आम्ही आता बोलत नाही’ तर शांताबाई यांची ‘स्पर्श सांगते सारी कहाणी’, वसंत बापट यांची ‘जीना’, गदिमांची ‘जोगिया’ या कवितांबरोबच ‘आताच अमृताची बरसून रात गेली’ ही सुरेश भट यांची गझल, ‘ही चाल तुरू तुरू’, ‘उडवू नको रंग थांब थांब कृष्णा’, ‘डौल मोराच्या मानचा’, ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ यासह विविध गीते सादर करण्यात आली.
सुप्रसिद्ध गायक राजेश दातार यांनी रसिकांशी संवाद साधताना सांगितले की, संगीत, सुरावट सगळे तेथेच असते पण काळानुसार त्याचे शब्द आणि स्वरूप मात्र बदलते. या विषयी सविस्तर बोलताना त्यांनी संगीतकार प्यारेलाल, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही रचनाही ऐकविल्या. दातार यांनी सादर केलेल्या अनेक कविता आणि गीतांपैकी ‘उडवू नको रंग थांब थांब’, ‘डौल मोराच्या मान चा’ अशा काही रचनांना रसिकांनी वन्स मोअरने दाद दिली.
‘ राजकारण.. फक्त राजकारण..
अरे नुसते बघता काय खेचा त्यांचे खेचा पाय,
देशभक्ती खड्ड्यात गेली नैतिकतेची लावा बोली, विरोधाची हद्द झाली सैन्यालाही भोवळ आली, पुरावे द्या – पुरावे द्या नाही तर माघार घ्या, सर्जिकल स्ट्राईक काय आम्ही येथे मानत नाय’ या रेश्मा कारखानीस यांच्या रॅप साँगला रसिकांनी भरभरून दाद देत पुन्हा पुन्हा ऐकविण्याची फर्माईशही केली.
जाहिरात –
जाहिरात –