गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : खेळ असो की राजकारण कुठल्याच क्षेत्रात कष्टाशिवाय यश मिळू शकत नाही. कष्टाला प्रामाणिकपणाची जोड असणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात काही मोलाचे ‘क्षण’ आठवणीत ठेवण्यासारखे असतात , हे स्टारविन्स आयोजित छायाचित्र प्रर्शनातून प्रकर्षाने जाणवले, असेही त्यांनी नमूद केले.
स्टारविन्स ग्रुपतर्फे शुक्रवार, दि. 21 ते दि. 23 एप्रिल या कालावधीत घोले रोडवरील राजा रवी वर्मा कलादालनात ‘क्षण’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन आज आमदार धंगेकर आणि पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते झाले.
त्या वेळी धंगेकर बोलत होते. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, स्टारविन्स ग्रुपचे संस्थापक प्रणव तावरे, व्यवस्थापक राज लोखंडे, विनायक रेणके व तेजस पांडे व्यासपीठावर होते.
लोकांच्या आयुष्यात आनंदी क्षण फुलविणाऱ्या पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, जलतरणपटू जलजा शिरोळे, आदित्य वैकुळ आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशन यांचा ‘क्षण’ पुरस्कार देऊन उद्घाटन सोहळ्यादरम्यान गौरव करण्यात आला. शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी बोलताना धंगेकर यांनी स्टारविन्स ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुकही केले.
प्रदर्शनातील छायाचित्रांचे कौतुक करून सहआयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, आपल्यालाही फोटोग्राफीची आवड आहे, पण ही आवड जोपासता आली नाही याची खंत आहे. ‘क्षण’ पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून सर्व पुणेकरांचा आहे, असे त्यांनी नमूद केले.
जलजा शिरोळे म्हणाल्या, केवळ हुशारी असून चालत नाही. हुशारीला कष्टाची जोड असणे आवश्यक आहे. वडिलांनी रिक्षा चालवून, एकवेळ उपाशी राहून आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेपर्यंत पोहोचविण्यास प्रोत्साहित केले.
छायाचित्रकारांना आपली कला प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडता यावी या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक प्रणव तावरे यांनी प्रास्ताविकात दिली. तेजस पांडे व इतर मान्यवरांचा सत्कार प्रणव तावरे आणि स्टारविन्स ग्रुपच्या सदस्यांनी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज देशपांडे यांनी केले तर आभार राज लोखंडे यांनी मानले.
जाहिरात –
जाहिरात –