गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार कै. शोभा भागवत यांना तर !
‘इंदिरा अत्रे पुरस्कार’ उल्हास केंजळे व प्रतिभा केंजळे यांना जाहीर !!
पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिलेल्या मराठी लेखिका तसेच पुण्यातील गरवारे बालभवनच्या माजी संचालिका कै. शोभा अनिल भागवत यांना जाहीर करण्यात आला आहे.
तर ‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार’ पिरंगुट जवळील संस्कार प्रतिष्ठान संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा व प्रौढ मतिमंदांसाठी निवासी शेती प्रकल्प राबविणारे उल्हास केंजळे व प्रतिभा केंजळे या दाम्पत्यास देण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, ‘दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी’ 352, सोमवार पेठ, पुणे 411 011 येथे संस्थेच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्काराचे यंदाचे तेरावे वर्ष असून हे पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजाराम दांडेकर यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे पुरस्कार संयोजन समिती प्रमुख प्रसाद भडसावळे व दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
शोभा अनिल भागवत यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप पंधरा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे. तर केंजळे दाम्पत्यास दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये व मानचिन्ह असे आहे.
पुणे शहराच्या पूर्व भागातील आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल अशा वर्गाच्या उन्नती करता झटणारी ‘दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी’ ही शिक्षण संस्था नावारूपाला आणण्यात गुरुवर्य आबासाहेब अत्रे व त्यांच्या पत्नी इंदिराबाई अत्रे यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आबासाहेब अत्रे यांनी आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही मौलिक कार्य केले तर इंदिराबाई अत्रे यांनीही अध्यापनासोबतच आपल्या कलागुणांना जाणीवेने जोपासले आणि त्याचा इतरांना लाभ करून दिला.
त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या कन्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत हा पुरस्कार दरवर्षी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्वांना देण्यात येत असल्याचे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. यांनी सांगितले.
शोभा भागवत या बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका, तसेच मुलांच्या अंतरंगात डोकावून त्यांच्या भावविश्वातील नेमकेपणा टिपणाऱ्या समर्थ लेखिकाही होत्या. गरवारे बालभवनच्या संस्थापक संचालिका या नात्याने त्यांनी अनेक पिढ्या घडविल्या. गुरूवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येत असून त्यांचे कुटुंबीय तो स्विकारणार आहेत.
उल्हास केंजळे व प्रतिभा केंजळे हे दाम्पत्य संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली तीन दशके मतिमंद मुलांची निवासी शाळा चालवत आहेत. वयाने प्रौढ झालेल्या मतिमंद मुलांचे संगोपन करतेवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी निवासी शेती प्रकल्प राबविण्याची संकल्पना सत्यात आणली अशा या दाम्पत्यास इंदिरा अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.