‘माहेरची साडी‘ नंतर विजय कोंडके यांची निर्मिती असलेला ‘लेक असावी तर अशी’ झळकणार नोव्हेंबरमध्ये !
इंगवलीतील कोंडके फार्म मध्ये माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहुर्त !
पुणे : ‘माहेरची साडी‘ या प्रचंड यश प्राप्त केलेल्या मराठी सिनेमानंतर ज्योती पिक्चर्स, मुंबई रसिकांसाठी घेऊन येत आहे ‘लेक असावी तर अशी‘ हा मराठी चित्रपट.
विजय कोंडके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा मुहुर्त इंगवली (ता. भोर, जि. पुणे) येथील कोंडके फार्म येथे आज (दि. 15) झाला. चित्रपटाचा मुहुर्त माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यासह प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत झाला.
विजय कोंडके यांची निर्मिती असलेल्या ‘माहेरची साडी‘ या कौटुंबिक चित्रपटाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रसिकांचा तुफानी प्रतिसाद मिळाला. ‘लेक असावी तर अशी‘ हाही कौटुंबिक चित्रपट असून यात यतीन कार्येकर, शुभांगी गोखले आणि गार्गी दातार हे मध्यवर्ती भूमिकेत आहेत. प्राजक्ता हनमघर, सविता मालपेकर, सुरेखा कुडची, कमलेश सावंत, ओंकार भोजने, अभिजित सावंत आणि नयना आपटे चित्रपटात झळकणार आहेत.
चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन मनोहर गोलांबरे यांचे असून कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन विजय कोंडके यांचे आहे.
चित्रपटात एकूण चार गीते असून पैकी दोन गीतांचे रेकॉर्डिंग प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते आणि प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात झाले आहे. अनिकेत कारंजकर यांच्यावर चित्रिकरणाची जबाबदारी आहे.
‘माहेरची साडी‘ या चित्रपटाचा मुहुर्त 1991 मध्ये अनंतराव थोपटे यांच्याच हस्ते झाला होता. या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. अनंतराव थोपटे यांच्यावर असलेल्या श्रद्धेतून ‘लेक असावी तर अशी‘ याही चित्रपटाचा शुभारंभ थोपटे यांच्याच हस्ते करण्यात येत असल्याचे विजय कोंडके म्हणाले. ‘माहेरची साडी‘ या चित्रपटला रसिकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे याही चित्रपटला रसिकांचा प्रतिसाद मिळेल अशा शब्दात अनंतराव थोपटे यांनी शुभेच्छा दिल्या.
ऐतिहासिक जागेत चित्रपटाचा मुहुर्त होत आहे याचा आनंद आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका देऊन विजय कोंडके यांनी जो विश्वास आपल्यावर दाखविला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन, असे शुभांगी गोखले म्हणाल्या.
कोंडके फार्मविषयी आठवणी सांगताना यतिन कार्येकर म्हणाले, पहिल्यांदा ज्या वेळी येथे आलो होतो त्या वेळी येथून जाताना इथली चिमूटभर माती घेऊन गेलो होतो. या चित्रपटाच्या निमित्ताने येथे कलाकारांचे कुटुंबच तयार झाले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
विजय कोंडके चित्रपटाविषयी म्हणाले, ‘माहेरची साडी‘ या चित्रपटाचे शुटिंग याच जागेत झाले आहे. ‘लेक असावी तर अशी‘ या चित्रपटाचे शुटिंगही याच जागेत व्हावे अशी अंतिम इच्छा आहे. मेच्या मध्यामर्यंत शुटिंग पूर्ण करण्यात येणार असून नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. एका वर्षात दोन चित्रपटांची निर्मिती करायचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. दादा कोंडके यांच्या सहवासात चित्रपटाचे वितरण ते चित्रपट निर्मिती हा प्रवासही त्यांनी उलगडून दाखविला.
सुरुवातीस दादा कोंडके यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक दादा पासलकर यांनी केले. स्वागत विजय कोंडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले.
————————————————-
जाहिरात -Click on Image
जाहिरात -Click on Image