गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण करण्याबरोबरच महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असलेल्या अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला आज (दि. 7 एप्रिल) सुरुवात झाली.
प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करताना विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, प्रा. डॉ. गिताली टिळक, चैत्राली चांदोरकर, नीता पारखी, अनघा जोशी.
महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन प्रभात रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार चैत्राली चांदोरकर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. गीताली टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
दीपप्रज्वलन करताना विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, प्रा. डॉ. गिताली टिळक, अनघा जोशी, नीता पारखी.
महिला आघाडी प्रमुख नीता पारखी, कोषाध्यक्ष अनघा जोशी व्यासपीठावर होत्या.
प्रदर्शन दि. 9 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळात खुले आहे. प्रदर्शनात ज्वेलरी, ड्रेस मटेरिअल, कॉस्मेटिक्स, बॅग्ज, पर्सेस, आयुर्वेदिक औषधे, पेंटिंग्जचे स्टॉलस् आहेत. खवय्यांसाठी पावभाजी, लोणी-थालिपीठ, वडापाव, चतुर्थीनिमित्त खास उपवास कचोरी, साबुदाणा वडा, उपवास भेळ इत्यादी व्यंजनांची मेजवानी आहे.
प्रदर्शनाची पाहणी करताना मान्यवर.
चैत्राली चांदोरकर म्हणाल्या, समाजात जे घडते ते माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचते. सरकारतर्फे समाजासाठी अनेक योजना जाहीर होत असतात; परंतु समाजाला काय हवे असते हे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कळते.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने आयोजित केलेल्या प्रदर्शनाद्वारे महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. कोरोनाच्या काळात अनेकांना समस्यांना सामोरे जावे लागले; परंतु समस्येतून सकारात्मक विचाराने अनेकांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले. त्यात महिलांची संख्या मोठी होती, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे.
प्रा. डॉ. गीताली टिळक म्हणाल्या, पणजी शांताबाई टिळक, आजी सिंधुताई टिळक यांच्याकडून समाजकार्याचे बाळकडू मिळाले आहे. त्याच शिकवणीतून कार्य करीत आहे. त्या पुढे म्हणाल्या, आपणही समाजाचे देणे लागतो या उद्देशाने महिलांचे सबलीकरण, महिलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घडत आहे, ही समाधानकारक गोष्ट आहे.
संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ भालेराव यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. समाजातील सर्व घटकांसाठी संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत नीता पारखी आणि अनघा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र प्रमुख मकरंद माणकीकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुग्धा भालेराव यांनी नृत्याद्वारे सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली.
आभार अनघा जोशी यांनी मानले.
संस्थेच्या महिला आघाडी सहप्रमुख सुवर्णा रिसबुड, सदस्या शैला गिजरे, पल्लवी गाडगीळ तसेच मुकुंद जोशी, शिरीष आठल्ये, उल्हास पाठक, माधव ताटके, शारंगधर अभ्यंकर, पुरुषोत्तम काशिकर, अनिल शिदोरे, परेश मेहेंदळे, मनोहर भांडारकर उपस्थित होते.
जाहिरात – Click on Image for more details
जाहिरात