गोल्डन आय न्यूज पुणे :
विजय पटवर्धन फाऊंडेशनकडून पडद्यामागील कलाकारांचा गौरव !
संघर्षाच्या काळात मदतीचा हात महत्वाचा ! : प्रवीण तरडे
विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रंगभूमीवर पडद्यामागे राहून निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा विशेष कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. भरत नाट्य मंदिर येथे ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमात रंगभूमीच्या यशामागील खऱ्या आधारस्तंभांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी अभिनेते तेजस बर्वे, देऊळबंद २ चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले , विजय पटवर्धन, सौ.वृषाली पटवर्धन उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पडद्यामागील कलाकारांचे योगदान हे नाटकाच्या यशासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमाला कपिल जोशी, प्रसाद शिवरकर, तेजस देवधर, उल्लेश खंदारे आणि सुलेखा तळवलकर यांचे मार्गदर्शन लाभले.











यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल गजेंद्र वाणी (प्रकाशयोजना सहाय्य), अभिजित इनामदार (संगीत संयोजन), मंदार बापट (व्यवस्थापक), कमलेश बिचे (रंगभूषाकार), निलेश खेडकर (प्रॉपर्टी), दीपक कांबळे कपडेपट), संदीप देशमुख (नेपथ्य निर्माण), संजय विसाळ (भोजन व्यवस्था), मधुरा ताम्हणकर (केशभूषा) आणि संजय चौखंडे (वाहनचालक) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रसाद शिवरकर,धनंजय आमोणकर, सुनील गोडबोले, सुरेंद्र गोखले, सुरेश जोग, रजनी भट, जयमाला इनामदार,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







रंगमंचावरील प्रत्येक यशस्वी प्रयोगामागे पडद्यामागील अनेक हात कार्यरत असतात. प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, केशभूषा, संगीत संयोजन, प्रॉपर्टी, कपडेपट, व्यवस्थापन, भोजन व्यवस्था आणि वाहन व्यवस्था अशा विविध विभागांतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे योगदान अमूल्य असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमानंतर पक्ष्यांच्या विविध आवाजांचा अर्थ उलगडणारा आणि त्यावर आधारित गीतांचा “पहल” हा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमालाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, ‘नाटक आपल्याला संघर्ष शिकवते.नाट्यगृहात नटाचे प्रशिक्षण होत असते.बॅक स्टेज च्या पाठीशी खंबीर राहायला हवे. धडपडीच्या काळात मदत मिळाली पाहिजे आणि मदत केली सुद्धा पाहिजे. देऊळ बंद -2 च्या यशातून मिळालेल्या पैशातून आम्ही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करत आहोत. मनोरंजन क्षेत्रातील अनेकाना वैद्यकीय, शैक्षणिक मदत करत आहोत.मदत घेणाऱ्याने पुढे सक्षम झाल्यावर इतर गरजूंना मदत करावी, इतकीच अट असते.
मेघराज राजेभोसले म्हणाले, रंगभूमी, चित्रपटसृष्टीची प्रगती होण्यासाठी सर्व प्रकारचे तांत्रिक कुशल कामगार तयार व्हायला हवेत. तांत्रिक गोष्टी शिकायला हव्यात. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास साड्या, धोतर नेसवणारे मदतनीस मिळत नाहीत. तंत्रज्ञांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित केले पाहिजे. पडद्या मागच्या कलाकारांना गौरविण्याचा पटवर्धन फाऊंडेशन चा हा उपक्रम महत्वपूर्ण आहे.
विजय पटवर्धन म्हणाले,’पडद्यामागचे कलाकार हेच सेलिब्रिटी असतात.पडद्यामागच्या कलाकारांमुळे आपण यशस्वी होतो. त्यांना गौरविण्याचा, कौतुकाची थाप पाठीवर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
तेजस बर्वे म्हणाले,’ राजाला राजा बनवणारे महत्वाचे आहेत,किंगमेकर महत्वाचे आहेत. म्हणून पडद्या मागचे कलाकार महत्वपूर्ण ठरतात. त्यांना ओळख मिळवून देणे गरजेचे आहे. म्हणूनच या सोहळ्याला मोठे स्वरूप प्राप्त व्हावे.
……………………….











