गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कलावंतांना वास्तववादाचे बंधन अन् समकलानीत्वाच्या बेड्या
चं. प्र. देशपांडे : पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे पारितोषिक वितरण !
पुणे : कलेच्या क्षेत्रात अनुभव हा मूल्य ठरू शकत नाही. अनुभव हे कलाकृतीचे माध्यम आहे. कल्पना मांडल्या जातात त्यावर शंका घेता आली पाहिजे. पण आजच्या समाजाला कलेविषयी देणे-घेणे राहिलेले नाही.
तात्कालिक समस्या कलेच्या माध्यमातून मांडण्यासाठी कलावंतांवर प्रचंड दडपण आहे. भूमिका घेण्यासाठी तसेच वास्तववादासाठी बंधने अन् समकालीनत्वाच्या बेड्याही घातल्या जात आहेत. त्याच प्रमाणे माणसाच्या जगण्यात बुद्धी प्रामाण्यवादाचे स्तोम माजविले जात आहेत, असे परखड मत ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी आज व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा करंडक स्वीकारताना म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचा संघ. (एकांकिका – बस नंबर 1532) समवेत मंजुषा जोशी, गिरीश परदेशी, धनंजय गोळे, चं. प्र. देशपांडे, अनंत निघोजकर, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 28) सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
स्पर्धेचे यंदो 59वे वर्ष असून स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, राजाभाऊ नातू यांचे स्नेही आणि सहकारी धनंजय गोळे, परिक्षक मंजुषा जोशी, गिरीश परदेशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर मंचावर होते. पारितोषिक स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत आनंद साजरा केला.
ज्याच्याकडे जगण्यातील सुख-दु:ख, समजून घेण्याची जिज्ञासा असते, चिंतनशीलता असते असा व्यक्ती कला क्षेत्रात काम करू शकतो, असे नमूद करून देशपांडे पुढे म्हणाले, मराठी माणसाला नाटकाकडे गंभीरपणे बघायचे नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. भीक भागून प्रेक्षक गोळा करावे लागतात, अशी प्रायोगिक रंगभूमीची अवस्था आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे वाटत असताना दुसरीकडे मराठी भाषा मरेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाटक हे केवळ करमणुकीचे साधन वाटू लागले आहे. वास्तववाद हा मराठी नाटकात अतिमहत्त्वाचा झाला आहे. कलेचे क्षेत्र मानसिक वास्तव्याचे आहे. अनुभव, वास्तववाद, मातीशी जोडलेले मुद्दे याविषयीही त्यांनी परखड शब्दात मते नोंदविली.
परिक्षकांच्या वतीने बोलताना गिरीश परदेशी म्हणाले, नाटकाची परिभाषा वेगळी असल्याने नाटकाचे शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. तांत्रिक बाजूंना अधिक महत्त्व दिल्यास नाटकाचा धागा हरविण्याची शक्यता असते. नाटक का करीत आहोत, हे प्रत्येकाने स्वत:ला विचारले पाहिजे. त्याच वेळी नाटकाच्या निर्मितीपासून ते प्रयोगापर्यंतचा धागा सापडू शकतो. वाचिक अभिनयाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाच्या सूचना केल्या.
रंगभाषा आणि चित्रभाषा यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे, असे मत गोपाळ जोशी यांनी व्यक्त केले. स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिका प्रचारकी स्वरूपाच्या नव्हत्या याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सादरीकरणात सामाजिक भान असावे, असे सूचित केले जात पण प्रत्येक वेळी सामाजिक भान कशाला हवे? मुलांचे प्रश्न मांडणे हे सामाजिक भान नाही का? नवे काही करताना जुन्याची जाण ठेवली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत अनंत निघोजकर यांनी केले. चं. प्र. देशपांडे यांचा परिचय धनंजय गोळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निकालपत्र वाचन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
_________________________________________
जाहिरात