गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‘रंगयात्री’ ॲपला विरोध !!
महापालिका प्रशासनाविरोधात बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घोषणा देत प्रशासनाचा निषेध !
पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित ‘रंगयात्री’ या ऑनलाईन आरक्षण सुविधेमध्ये त्रुटी जाणवत असल्याने नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक व संयोजकांनी ‘रंगयात्री’ ॲपला विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला विरोध करत बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात आज (दि. 12) घंटानाद करून, घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांच्या वतीने महापालिका प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महापालिकेच्या ‘रंगयात्री’ ॲप संदर्भातील निर्णयाला घोषणा देऊन विरोध करताना नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक.
नाट्यगृहांच्या आरक्षणाची सुविधा ‘रंगयात्री’ ॲपद्वारे उपलब्ध करून दिल्यास नाट्यगृहांचे आरक्षण कोणत्या कारणासाठी होईल यावर प्रशासनाचे नियंत्रण राहणार नाही. राजकीय संस्था किंवा राजकीय वर्चस्व असलेल्या सामाजिक संस्थांमुळे कलावंत, नाट्य व्यावसायिकांना नाटकांच्या तारखा मिळणे अवघड होईल. ‘रंगयात्री’ ॲप रंगकर्मी, नाट्य निर्माते, नाट्य व्यावसायिक यांच्या दृष्टीने जसे त्रासदायक ठरणार आहे त्याप्रमाणे महापालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील प्रथम सांस्कृतिक केंद्र आहे व ते रंगमंदिरच रहावे, व्यावसायिक सभागृह होऊ नये असे वाटते. तारखांच्या आरक्षणासंदर्भात प्रशासनाकडे लेखी अर्ज आले तर नाट्यगृहाचे आरक्षण कोणत्या कारणासाठी होत आहे, हे समजू शकेल आणि त्या प्रमाणे भाडे आकारणी करता येईल.
या विषयी बोलताना कोथरूड नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, सध्या चौमाही तारखा वाटपाची पद्धत आहे.
नाट्य व इतर संस्थांना त्यांचे झालेले कार्यक्रम बघून पुढील तारखा दिल्या जातात. प्रसिद्ध कलाकारांच्या तारखा ऐनवेळी मिळतात त्यामुळे संयोजकांना धावपळ करावी लागते. ऑनलाईन सुविधेमुळे तारखा निश्चित होण्यावर परिणाम होईल आणि नाट्यप्रयोगांची संख्या कमी होईल. महापालिकेने रंगयात्री ॲपचा निर्णय रद्द न केल्यास कलावंत आंदोलन करतील.

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येत आहे. ही बैठक जो पर्यंत होत नाही तो पर्यंत महापालिका प्रशासनाने कुठलाही निर्णय घेऊ नये.
सुनील महाजन, बाबासाहेब पाटील, सत्यजीत धांडेकर, समीर हंपी, प्रमोद ननावरे, प्रवीण बर्वे, शशी कोठावळे, मोहन कुलकर्णी, शिरीष रायरीकर, शिरीष कुलकर्णी, वरुण कांबळे, रणजीत सोनावळे, दीपक पवार, राजन भुवड, प्रमोद रणनवरे, अतुल वायचळ, शिरीष गोडबोले, अक्षय जगताप, जतिन पांडे, अशोक जाधव, स्वाती शहा, उमेश बेहरे, गणेश भोसले, मुकेश देठीया, बाळकृष्ण कलाल यांनी आंदोलनात सहभाग घेतला.











