गोल्डन आय न्यूज नेटवर्क
खुल्या संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेत ‘स्वराधीन’ प्रथम !!
पद्मश्री जयमाला शिलेदार जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन !!
पुणे : पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकपात्री कलाकार परिषद, कलांगण अकादमी, निळू फुले कला अकादमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेत ‘स्वराधीन’ संघाने संगीत सौभद्रमधील संगीतमय नाट्यप्रवेश सादर करून तर ‘संरचना’ संघाने संगीत एकच प्यालामधील गद्य प्रवेश सादर करत प्रथम क्रमांक पटकाविला.
पद्मश्री जयमाला शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित खुल्या संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतील विजेत्यांसमवेत मान्यवर
निळू फुले कला अकादमी (शास्त्री रस्ता) येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्या संघांना तसेच कलाकारांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
सांघिक संगीतमय प्रवेश : प्रथम – स्वराधीन (संगीत सौभद्र), द्वितीय – स्वरकीर्ती (संगीत संन्यस्तखड्ग), तृतीय – मन्वंतर (संगीत ययाती आणि देवयानी).
सांघिक गद्यप्रवेश : प्रथम – संरचना (संगीत एकच प्याला), द्वितीय – धन्वंतरी (संगीत संशयकल्लोळ), तृतीय – कलावैविध्य (संगीत संशयकल्लोळ).
वैयक्तिक पारितोषिके – उत्कृष्ट गायन – सृष्टी सबनीस, कीर्ती कस्तुरे, सिद्धा पाटणकर, ऐश्वर्या भोळे.
वैयक्तिक अभिनय – श्रद्धा मुळे, हेमंत संचेती, अर्चना साने, स्मिता दामले.
संगीत साथ – स्वानंद नेने, मास्टर लव्हेकर.
उत्तेजनार्थ – गायन, अभिनय – संज्ञा कुलकर्णी, डॉ. वंदना जोशी, मेधा गोखले, इरा गोखले, डॉ. राजन जोशी, आरोह देशपांडे.

स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध गायक अभिनेते रवींद्र कुलकर्णी आणि ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी केले. पारितोषिक वितरण प्रसंगी सतार व संवादिनी वादक गौरी शिकारपूर, जेष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, प्रदिप रास्ते, गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना वर्षा जोगळेकर म्हणाल्या, एका विशिष्ट लयीत गद्याचे सादरीकरण करणे आणि त्यातच संगीताचा समावेश करणे यासाठी कौशल्य गरजेचे असते. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, महाराष्ट्रात संगीत नाटकाला मोठी परंपरा असून त्याची जपणूक होत ती प्रवाहित राहणे आवश्यक आहे.

विजयकांत कुलकर्णी म्हणाले, संगीत नाटकाची ताकद खूप मोठी आहे. याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. संगीत नाटकाला पुन्हा सोन्याचे दिवस आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील संगीत नाटकांची परंपरा टिकवायची असेल तर अशा प्रकारच्या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत, असे मत गौरी शिकारपूर यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात संजय गोसावी म्हणाले, संगीत नाटकाच्या क्षेत्रात चांगले कलाकार घडावेत या करिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन अनुपमा कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन नरेंद्र लवाटे यांनी केले.











