गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पुलंना कलेमागील माणूसही महत्वाचा वाटायचा
आस्वादक वृत्तीला कृतीची जोड देत पुलंनी रसिकता जोपासली !!
ग्लोबल पुलोत्सवात ‘आस्वादक पुलं’ परिसंवादातून पुलंच्या रसिकत्वाचे दर्शन !!
पुणे : पुलं विचारवंत, तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक कलाप्रकारांचा विविध अंगाने अभ्यास केला, व्यासंग जोपासला. त्यांना अनेक गोष्टी शिकण्याची आस होती. मूल्यनिष्ठा ही त्यांच्या जीवनाचा गाभा होती. पुलंच्या मनात कमालीची संवेदना होती. त्यांनी अनेक कलांचा आस्वाद घेत रसिकतेचे पोषण केले. त्यात सौंदर्य हेच परिमाण नव्हते तर त्यामागील माणूसही पुलंना महत्वाचा वाटायचा.
आस्वादक वृत्तीला, माणूसपणाला, माणुसकीला कृतीची जोड देत त्यांनी खऱ्या अर्थाने रसिकता जोपासली, अशी गुणवैशिष्ठ्ये आज उलगडली.
कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल पुलोत्सवात आज (दि. 8) ‘आस्वादक पुलं’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ संपादक भानू काळे, ज्येष्ठ चित्रकार रवी मुकुल, प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, साहित्याच्या अभ्यासक डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी मनोगतातून पुलंच्या आठवणींसह त्यांच्यातील गुणग्राहकतेचे विविध किस्से सांगितले.
ग्लोबल पुलोत्सवात आयोजित ‘आस्वादक पुलं’ परिसंवादात सहभागी (डावीकडून) डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, भानू काळे, डॉ. मंदार परांजपे, कौशल इनामदार, रवी मुकुल, प्रमोद कांबळे.
परिसंवादात सहभागी झालेल्या मान्यवरांशी डॉ. मंदार परांजपे यांनी संवाद साधला. बालगंधर्व कलादालनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आस्वादक पुलं’ उलगडत असताना प्रमोद कांबळे यांनी पुलंचे मोहक शिल्प साकारले.
आनंदाच्या परिघात अनेकांना सामील केले..
भानू काळे म्हणाले, ‘गुण गाईन आवडी’ हा पुलंचा स्थायीभाव होता. ते निर्भेळ शब्दात, मोकळ्या मनाने, मुक्त कंठाने साहित्यिक-कलाकारांचा गौरव करत. आपल्या शब्दांमधून ते समोरच्याला नेहमीच उत्तेजना, प्रेरणा देण्याचे कार्य करीत असत. पुलंनी विविध कलांच्या आस्वादातून मिळणाऱ्या आनंदाच्या परिघात अनेकांना सामील करून घेतले.

उत्तम रसिकत्वाची परिसीमा म्हणजेच पुलं..
प्रशंसेपलिकडेही जाऊन मोलाचे शब्द देणारा महान कलाकार म्हणजे पु. ल. देशपांडे होय असे आवर्जून नमूद करून कौशल इनामदार म्हणाले, पुलंनी दिलेली दाद ही फक्त शब्दच नसत तर ते समंजस उद्बोधक भाष्य असे. सृजनाच्या उत्प्रेरकापलिकडेही जाणारे त्यांचे व्यक्तीत्व होते. उत्तम रसिकत्वाची परिसीमा म्हणजेच पुलं होय. फक्त संगीतच नव्हे तर ज्या ज्या कला त्यांना आवडल्या त्या त्यांनी मनापासून आस्वाद घेत स्वत:ला साहित्यकार म्हणून घडविले.
नुसती समृद्धी कामाची नाही असे मत असणाऱ्या पुलंना खऱ्या अर्थाने रसिकता, आस्वादकता जोपासण्याची आस होती.चित्र म्हणजे अक्षांश, रेखांशाने मांडलेला नकाशा नव्हे..
पुलंबरोबरच्या चित्रमय आठवणींना उजाळा देत रवी मुकुल म्हणाले, मी केलेली अनेक चित्रे पुलंनी आस्वादकाच्या भूमिकेतून पाहिली. त्यातील अनेक चित्रे त्यांनी नावाजली देखील.
चित्र म्हणजे फक्त अक्षांश, रेखांशाने मांडलेला नकाशा नव्हे तर त्यात लालित्य दिसावे असे त्यांचे मत होते. कादंबरीचे चित्र रेखाटल्यानंतर त्यांना ते भावल्यास चित्रकाराला कादंबरी उमजली आहे, अशा शब्दात ते आवर्जून कौतुक करत.

आपुलकीची नजर महत्वाची…
डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी म्हणाल्या, पुलंच्या आस्वादाला अनेक पदर होते. पुलंनी अनेक कलांचा विविध अंगाने आस्वाद घेतला. चित्र-शिल्प-संगीत आदी कलांचा भौगोलिक सीमा ओलांडून अतिशय जिव्हाळ्याने आनंद घेत त्या विषयी त्यांनी भरभरून कौतुक करत लिखाण केले.
त्यांच्यातील आपुलकीची नजर महत्वाची होती. रसिकता आस्वादापुरती मर्यादित न ठेवता ती शब्दांमधून व्यक्त करत त्यांनी इतरांनाही आनंद दिला. फक्त साहित्यकार-शिल्पकार-चित्रकार यांचेच नव्हे तर समाज घडविणाऱ्या अनेकांचे कार्य पुलंनी त्यांच्या विचारातून, शब्दातून तसेच कृतीतून मांडले.
बालगंधर्व रंगमंदिरातील जागतिक कीर्तीच्या ठेव्याकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष..
पुलंच्या आठवणी सांगताना प्रमोद कांबळे म्हणाले, कलाकाराने स्वत:चे काम उत्स्फूर्ततेने साकारावे, दुसऱ्याच्या कलेची नक्कल करायला जाऊ नये. सतत नाविन्याचा शोध घ्यावा असा सल्ला मला या महान कलाकाराकडून मिळाला आहे. पुलंच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्व यांची स्त्री व पुरुष वेशातील चित्रे त्या काळातील जगप्रसिद्ध चित्रकार गोपाळ देऊसकर यांनी रेखाटली होती.
समकालीन चित्रकारांपेक्षा देऊसकर यांचे मानधन अनेक पटींनी जास्त असले तरी पुलंच्या दूरदृष्टीतून ही चित्रे रेखाटण्याची जबाबदारी देऊसकर यांनाच देण्यात आली. या चित्रांना अभ्यासण्यासाठी आजही जगभरातून अनेक कलाकार आवर्जून भेट देतात. परंतु बालगंधर्व रंगमंदिराच्या व्यवस्थापनाचे या चित्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. चित्रांची नियमीत देखभाल न करणे, चुकीची प्रकाश योजना, सतत काढली जाणारी छायाचित्रे यामुळे या चित्रांवर परिणाम होत आहे. तसेच दोन छायाचित्रांमध्ये असलेली गोपाळ देऊसकर यांच्या नावाची पाटी देखील काढून टाकण्यात आली आहे.
जागतिक कीर्तीचा ठेवा असलेल्या या चित्रांचे जतन व संवर्धन तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने व्हावे, अशी आग्रही भूमिका प्रमोद कांबळे यांनी या परिसंवादादरम्यान मांडली.
सृजनाच्या अनेक कलांमध्ये रस घेणारे, त्याचा बहुमान करणारे, रसास्वाद उपभोगणारे पुलं अशा शब्दात वर्णन करून डॉ. मंदार परांजपे यांनी निवेदनाच्या माध्यमातून पुलंचे अनेक किस्से, स्वभावविशेष उलगडत गप्पांमध्ये रंग भरले.
मान्यवरांचे स्वागत पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहल दामले यांचे होते.











