गोल्डन आय न्यूज नेटवर्क
व्यावसायिक संगीत कलावंत घडविण्यासाठी विशिष्ट कलाप्रशिक्षणाची गरज : पंडित अजय चक्रवर्ती !!
पुणे : शालेय वयापासून योग्य प्रयत्न, दिशा आणि प्रशिक्षण मिळाल्यास, आजच्या काळातही उत्तम दर्जाचे व्यावसायिक संगीत कलावंत घडवणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी विशिष्ट कलाप्रशिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक, गुरू, विचारवंत पंडित अजय चक्रवर्ती यांनी केले. पु. ल. देशपांडे हे विलक्षण प्रतिभेचे बहुआयामी कलावंत होते. त्यांच्या स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन करून, मी त्यांच्या नावाच्या सन्मानाचा स्वीकार करण्यास मान्यता दिली, असेही ते म्हणाले.
ग्लोबल पुलोत्सवाअंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंडित अजय चक्रवर्ती. समवेत सतीश जकातदार, कृष्णकुमार गोयल, वीरेंद्र चित्राव.
कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे ग्लोबल पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुलोत्सवात पतियाळा घराण्याचे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित अजय चक्रवर्ती यांना शनिवारी (दि. ८) यावर्षीचा ‘पु. ल. स्मृती सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने पंडित अजय चक्रवर्ती यांच्याशी आज (दि. ७) पत्रकार भवन, नवी पेठ येथे माध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार उपस्थित होते.
पंडित अजय चक्रवर्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष भेटता न आल्याची खंत व्यक्त केली. पु. लं.विषयी मी अनेक मान्यवर व्यक्तींकडून खूप ऐकले आहे. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, सामाजिक कार्य अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य करून ठसा उमटवला आहे.
विशेषतः संगीतक्षेत्रात त्यांनी साहित्याप्रमाणे चौफेर कामगिरी केली. चित्रपट, भावसंगीत, नाट्यसंगीत, रागसंगीत, संवादिनीवादन यासह संगीतकार, रचनाकार, अभिनेते, दिग्दर्शक, अनुवादकार, साहित्यिक अशा पुलंच्या विविध पैलूंची मला माहिती आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पुलंनी बालगंधर्वांची गायन परंपरा संवादिनी वादनातून पुढे नेली. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या नावाने दिला जाणारा सन्मान माझ्यासारख्या संगीताच्या विद्यार्थ्याला मिळत आहे याविषयी कृतज्ञ आहे. पुलंच्या नावे होणाऱ्या कार्यक्रमांना आजही गर्दी होते. अशा बहुआयामी कलाकाराच्या नावाने पुरस्कार मिळणे ही आनंद व समाधानाची गोष्ट आहे.
पुस्तकाचे लेखन सुरू..
भारतीय संगीत ही जगातील अनन्यसाधारण आणि अतुलनीय कला आहे. हे अतुलनीयत्व अधोरेखित करणारे ‘म्यूझिक रिव्हिजिंटिंग’ हे पुस्तक मी सध्या लिहीत आहे. त्यामध्ये क्यूआर कोड समाविष्ट असतील. पुढच्या वर्षी हे पुस्तक रसिकांपर्यंत पोचेल, असे पंडित चक्रवर्ती म्हणाले. संगीताकडे नेमके कसे पहावे, याची दृष्टी या पुस्तकातून मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
एनसीपीएप्रमाणे पुण्यातही केंद्र सुरू करण्याचा विचार..
मुंबई येथील एनसीपीएमध्ये मी काही विद्यार्थ्यांना शिकवतो, तसे केंद्र पुण्यातही लवकरच सुरू करण्याचा विचार आहे. कारण पुण्यात संगीताचे वातावरण अधिक सकारात्मक आहे.
खरे तर महाराष्ट्रातच संगीत उरले आहे, असे म्हणायला हवे. पूर्वी देशाची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या बंगालमधून मी येतो. परंतु राजकीय व सामाजिक स्थित्यंरामुळे आज तेथील भवताल कलेला अनुकूल नाही. त्यामुळे ज्या मातीत संगीत आजही आहे, त्या महाराष्ट्रात संगीत प्रशिक्षणाचे कार्य करण्याचा विचार आहे, असे पंडित चक्रवर्ती म्हणाले.
वेगळे तंत्र, पद्धत अंगिकारली पाहिजे..
संगीतावर उपजीविका उत्तम पद्धतीने होऊ शकते, हा विश्वास पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. मात्र, असे दर्जेदार व्यावसायिक संगीत कलावंत घडविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे.
त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वरज्ञान, साहित्यज्ञान, श्वासोच्छ्वासावरील योग्य नियंत्रणाचे तंत्र, स्वरांचा ओलावा, रसिकांच्या, कलावंतांच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आणि कलेप्रती आदर, प्रेम, निष्ठा, समर्पण असे प्रमुख मुद्दे समाविष्ट असले पाहिजेत.
हे मुद्दे आजच्या कुठल्याही कलाप्रशिक्षणात आढळून येत नाहीत, असेही मत त्यांनी मांडले. पूर्वसुरींना कलेसाठी जे तीव्र संघर्ष करावे लागले, तसे आजच्या विद्यार्थ्यांना करावे लागत नाहीत. त्यामुळे आजच्या कलाविद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे वेगळे तंत्र, पद्धत अंगिकारली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.











