गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हिंद युवक मित्र मंडळातर्फे आधार मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !!
पुणे : हिंद युवक मित्र मंडळातर्फे सेवा सहयोग पुणे आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या सहकार्याने ‘वसा शिक्षणाचा आशीर्वाद बाप्पाचा’ या उपक्रमाअंतर्गत बिबवेवाडीतील आधार मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, रक्ताचे नाते ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष राम बांगड, अप्पा मणेरे, शिक्षिका पूर्वा महाले, वसतीगृह अधीक्षक उज्ज्वला थोरात, काळजीवाहक देवानंद घाडगे, हिंद युवक मित्र मंडळाचे कार्यकर्ते केतन भागवत, सचिन चौधरी, विजय दवे, राहित शिंदे, संतोष शिंदे, हरिश मेमाणे, जय पंदारे आदी उपस्थित होते.
हिंद युवक मित्र मंडळातर्फे आधार मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी आणि मान्यवर.
उपक्रमाविषयी माहिती देताना केतन भागवत म्हणाले, हिंद युवक मित्र मंडळ 40 वर्षांपासून कार्यरत असून गेल्या चार वर्षांपासून पुणे परिसरातील शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहे. मदत कार्यात समाजातील विविध घटक सहभागी होत असल्याने सुशिक्षित पिढी घडण्यात मदत होत आहे.
मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत देऊन मंडळातर्फे मोठे कार्य केले जात आहे, असे सांगून महेश सूर्यवंशी म्हणाले, अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेचे कार्यही समाजासमोर येण्यास मदत होते. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये किती संवेदनशीलता आहे हे सुद्धा अशा समाजोपयोगी उपक्रमांमधून दिसून येते. या संस्थेत मुलांना पदवी शिक्षणापर्यंत राहण्याची सुविधा मिळाल्यास मुलांचे भविष्य उज्ज्वल ठरेल. मूकबधीर विद्यार्थ्यांबरोबरच पालक नसलेल्या मुलांचीही शिक्षणाची सुविधा व्हावी, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
राजीव जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांचा सत्कार विजय दवे, संजय शिंदे, तन्मय पारेकर, सुमित काची, विजय लोणकर यांनी केला. रवींद्र मेमाणे यांनी आभार मानले.
—–———————————————————-जाहिरात