गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे सोमवार, मंगळवारी ‘मेघरंग’ कार्यक्रम !!
गायन, वादनातून अनुभवता येणार मल्हार रागाची गोडी
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेघरंग’ या कार्यक्रमात गायन आणि वादनातून मल्हार रागाची गोडी अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार, दि. 28 रोजी सायंकाळी 6:30 वाजता निवृत्त आयकर आयुक्त डॉ. राजीव रानडे यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर अपर्णा पणशीकर आणि पंडित सुरेश बापट यांचे गायन होणार आहे.
मंगळवार, दि. 29 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता रोहित मराठे यांचे संवादिनी वादन, अनुपम जोशी यांचे सरोद वादन आणि जुई धायगुडे यांचे गायन होणार आहे. कलाकारांना संजय देशपांडे, ऋषिकेश जगताप, प्रणव गुरव (तबला), पंडित प्रमोद मराठे, लीलाधर चक्रदेव, अमेय बिच्चू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, कमांडंट तेजस्वी सातपुते यांची उपस्थिती असणार आहे. दोन्ही दिवस कार्यक्रम शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.