गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नवकल्पनांचा शोध आणि त्यांचा पाठपुरावा, हे डॉ. सुधीर हसमनीस यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य
प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार राहुल सचदेव यांचे प्रतिपादन !!
डॉ. सुधीर हसमनीस यांच्या ‘सेवन्टी व्हिज्डम बाईट्स’ पुस्तकाचे प्रकाशन !!
पुणे : नवकल्पनांचा शोध आणि त्यांचा पाठपुरावा, हे डॉ. सुधीर हसमनीस यांचे वैशिष्ट्य आहे. ‘सेवन्टी व्हिज्डम बाईट्स’ या छोटेखानी पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी छायाचित्रांच्या सोबतीने त्यांच्या आयुष्यातील विचारधन वाचकांसमोर मांडले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार राहुल सचदेव यांनी केले.
प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार, अध्यापक, लेखक डॉ. सुधीर हसमनीस लिखित ‘सेवन्टी व्हिज्डम बाईट्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राहुल सचदेव यांच्यासह युवा पिढीतील प्रसिद्ध छायाचित्रकार अनुपम ठोंबरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सेवन्टी व्हिज्डम बाईट्स’च्या प्रकाशनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
राहुल सचदेव म्हणाले, नवकल्पनांचा शोध आणि पाठपुरावा, हे या पुस्तकाचेच नव्हे तर डॉ. सुधीर हसमनीस यांच्या जगण्याचेही वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाच्या पानापानांतून त्यांनी टिपलेल्या पक्ष्यांच्या अप्रतिम छायाचित्रांप्रमाणेच, वैविध्यपूर्ण असे त्यांचे विचारवैभव सामावले आहे. जीवनाचा शोध घेण्याचा त्यांचा प्रवास आणि त्यांच्या अनुभवांतून, अभ्यासातून, निरीक्षणांतून त्यांना सुचलेले विचार, इथे व्यक्त झाले आहेत. ज्या गुरुंकडून आपण शिकतो, एक दिवस त्या गुरुंपासून वेगळे होणे आणि स्वतःची वाट निवडून स्वतःचा प्रवास सुरू करणे गरजेचे असते, हा डॉ. हसबनीस यांनी मांडलेला विचार मला विशेष भावला.
अनुपम ठोंबरे म्हणाले, निसर्ग हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे, हे डॉ. सुधीर हसमनीस यांनी या पुस्तकातून अधोरेखित केले आहे. शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते, ती कधीच संपत नाही. वाट कुठलीही निवडा, प्रवास संपत नाही. नव्या वाटा, नव्या संधी, नवे काम यांना वयाचा विचार न करता, सामोरे जायला हवे, हे त्यांचे विचार सांगतात. शिकण्यासाठी स्वतःला सतत तयार ठेवणे, ही त्यांची वृत्ती अतिशय महत्त्वाची आणि अनुकरणीय आहे.
मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधीर हसमनीस म्हणाले, पराकोटीची कार्यमग्नता असताना, प्रकृतीने केलेल्या असहकारातून मी छायाचित्रणाकडे वळलो आणि तो छंद माझे आयुष्य बदलणारा ठरला. मी फेसबुकवर सलग १० वर्षे रोज एक पोस्ट, असा विक्रम केला, ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि द एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् यांनी घेतली.
वन्यजीव छायाचित्रण आणि पर्यावरण जतन या क्षेत्रातील माझ्या कामाची दखल सातत्याने घेतली जाऊ लागली. मी वन्यजीव संदर्भात तीन पुस्तकांचे लेखन केले. प्रस्तुत पुस्तकात माझ्या ७० वर्षांच्या जगण्याचे सार मांडले आहे. आयुष्याने आजवर जे शिकवले, त्यामध्ये ४० वर्षांचे कॉर्पोरेट जीवन, १५ वर्षांचे शैक्षणिक क्षेत्रातील अध्यापनकार्य तसेच छायाचित्रणकलेचा कालखंड समाविष्ट आहे. वाचकांना हे विचार उपयुक्त ठरतील, असा विश्वास मला वाटतो.

डॉ. हसमनीस यांच्याविषयी रीतेश देवरे, विनायक पटवर्धन, अस्मिता, गिरीश कुलकर्णी, शशिकांत कामत, डॉ. अभय कुलकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले. राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी ध्वनिमुद्रित स्वरुपात शुभेच्छा व्यक्त केल्या. गायत्री यांनी आभार मानले तर संचारी मजूमदार यांनी सूत्रसंचालन केले.











