गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड !!
गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान !
पुणे : पुराण काळातील ग्रंथांमध्ये ‘मधुकरी’ या नावाने सनई-शहनाईसारख्या मिळत्या जुळत्या वाद्याचा उल्लेख आढळतो. सनई या वाद्याविषयी मतप्रवाह असले तरी मंदिर परंपरेशी जोडले गेलेले हे वाद्य असून हृदयाला भिडणारे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शहनाईवादक डॉ. प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केले.
गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय स-प्रात्यक्षिक मुक्तसंगीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) दयानंद घोटकर, डॉ. प्रमोद गायकवाड, निलेश रणदिवे, आनंद माडगुळकर, पराग गाडगीळ, वैष्णवी देशपांडे, डॉ. निलिमा राडकर.
चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी (दि. 12) ‘शहनाई’ या विषयावर डॉ. प्रमोद गायकवाड बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजक पराग गाडगीळ, गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख पंडित अतुलकुमार उपाध्ये, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध गायक, लेखक व निर्माते आनंद माडगुळकर, डॉ. निलिमा राडकर मंचावर होते.
शहनाई वादन करताना डॉ. प्रमोद गायकवाड, नम्रता गायकवाड आणि सहकलाकार.
याच कार्यक्रमात नृत्य पंडिता विदुषी कै. सुजाता नातू पुरस्कृत युवा कथक कलाकार पुरस्कार वैष्णवी देशपांडे व उत्कृष्ट संगतकार पुरस्कार तालवादक निलेश रणदिवे यांना प्रदान करण्यात आला.
शहनाई या वाद्याची निर्मिती, परंपरा, वादन कला या विषयी विस्तृत विवेचन करून डॉ. प्रमोद गायकवाड म्हणाले, शहनाई वादन करणाऱ्या कलाकारांची संख्या फारच कमी आहे, कारण हे वाद्य वाजवायला फार अवघड आहे. वादनाचे तंत्र सहजासहजी आत्मसात करता येत नाही. वादनासाठी आवश्यक असणारी ‘रिड’ स्वत: तयार करावी लागते. थोडीजरी चूक झाली तरी वादन बेसूर होते.
डॉ. गायकवाड यांनी रागेश्री राग सादर केला. त्यांना नम्रता गायकवाड (सहवादन), निलेश रणदिवे (तबला) यांनी यांनी साथसंगत केली तर शिल्पा देशपांडे यांनी संवाद साधला.
शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने गानवर्धन संस्था 1982 पासून मुक्त संगीत चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. शास्त्रीय संगीतामधील गायन, वादन व नृत्य या विषयांमधील शास्त्र, सौंदर्यस्थळे व सादरीकरण याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उभरत्या कलाकारांना उपयुक्त ठरते, असे दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मुक्तसंगीत चर्चासत्र या गानवर्धनच्या उपक्रमाचे कौतुक करून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आनंद माडगुळकर म्हणाले, ताल, सूर, नृत्य ही ईश्वराची देणगी असून या सांगीतिक प्रकाराला भाषेची गरज लागत नाही. हे संगीत वैश्विक असल्याने प्रत्येकाला यातून आनंद मिळू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासंती ब्रह्मे यांनी केले.