गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ऑगस्टमध्ये
स्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 जुलैला होणार
पुणे : हीरक महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धा दि. 10 ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेचे अर्जवाटप दि. 14 व दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळात संस्थेच्या सुभाषनगरमधील कार्यालयात होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज दि. 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळात नातू वाडा, 418 शनिवार पेठ येथे जमा करायचे आहेत.
स्पर्धेचे लॉटस् दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे काढण्यात येणार आहेत. दि. 10 ते 24 ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा होणार आहे. अंतिम फेरी दि. 13 व दि. 14 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 19 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि स्पर्धेचा इतिहास पुस्तकरूपात
महाराष्ट्रीय कलोपासक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
राजाभाऊ नातू स्मृतिदिनानिमित्त ‘महापूर’चा प्रयोग
महाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सतीश आळेकर लिखित ‘महापूर’ या नाटकाचा प्रयोग शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रयोग सर्वांसाठी खुला असून प्रवेशिका आवश्यक आहे.
ऋषी मनोहर दिग्दर्शित या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका आहेत.