गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गांधर्व महाविद्यालय, सप्रेमतर्फे शनिवारी-रविवारीअण्णासाहेब बेहरे स्मृती युवा संवादिनी संमेलनाचे आयोजन !!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय व संवादिनी प्रेमी मंडळ (सप्रेम) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13 व दि. 14 एप्रिल रोजी अण्णासाहेब बेहरे स्मृती युवा संवादिनी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून 12 गुरुंच्या 18 शिष्यांचा संमेलनात सहभाग असणार आहे. अशा पद्धतीने आयोजित करण्यात येत असलेले युवा कलावंतांचे संमेलन संवादिनीप्रेमी तसेच पुणेकर रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
संमेलन गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात तीन सत्रात आयोजित करण्यात आले असून संमेलनात 16 ते 30 या वयोगटातील कलावंतांचा सहभाग असणार आहे. संमेलनाचे उद्घाटन अण्णासाहेब बेहरे यांच्या स्नुषा अरुणा अशोक बेहरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
अण्णासाहेब बेहरे यांना लहानपणापासूनच संवादिनी वादनाची आवड होती. शालेय, उच्चशिक्षण आणि व्यवसायामुळे ते कलेसाठी वेळ देऊ शकले नाहीत. त्यांच्या व्यवसायात मुलांचे पदार्पण झाल्यानंतर बेहरे यांनी वयाच्या 65व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयात संवादिनी वादनाच्या शिक्षणास सुरुवात केली. अखेरच्या श्वासापर्यंत बेहरे संवादिनी शिक्षण घेत होते आणि वादनही करीत होते. पर्यावरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे.
संमेलनाचे पहिले सत्र शनिवार, दि. 13 रोजी सायंकाळी 5 ते 9 या वेळात होणार असून यात सुधन्वा कुलकर्णी, भावार्थ पिंजारकर, मल्हार चावरे, आकांक्षा केळकर, ऋतुराज धुपकर, आदिती गराडे यांचे वादन होणार आहे. दुसरे सत्र रविवार, दि. 14 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात होणार असून यात प्रथमेश चोपडे, स्वानंद राजोपाध्ये, अंकिता कुंभार, ओजस रानडे, यश खडके, सारंग सांभारे यांचे वादन होईल.
अखरेचे तिसरे सत्र (दि. 14) सायंकाळी 5 ते 9 या वेळात होत असून यात मालू गावकर, नचिकेत हरिदास, अथर्व कुलकर्णी, आकाश जलमी, वरद सोहनी, अमेय बिच्चु यांचे संवादिनी वादन होणार आहे. कलाकारांना केदार टिकेकर, श्रीधर गावकर, पराग पांडव, अमित जोशी, सोहम राजोपाध्ये, राज भद्र, आशय कुलकर्णी, अनुराग अलुरकर, चिन्मय लेले, प्रसाद महाजन तबला साथ करणार आहेत.
जाहिरात