गोल्डन आय न्यूज नेटवर्क
हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी जनजागृतीसाठी ‘बाहुला बाहुली’ चा विवाह संपन्न !
लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, फुलगाव चा उपक्रम
‘हुंडा घेणार त्यांना विरोध करा, समाज बदलण्यास मदत करा’, ‘हुंडा नाकारु, समानतेचे नवे पर्व सुरु करु’, ‘हुंडा नाही प्रेम हवे, नवीन संसारात सुख हवे’ अशा घोषणा देत फुलगाव येथील लोकसेवा इंग्रजी माध्यम शाळेत अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. समाजात अजूनही होत असलेले ‘हुंडाबळी’ तसेच ‘स्त्री-भृण हत्या’ याविरुद्ध प्रबोधन करण्याच्या हेतूने शाळेने ‘बाहुला बाहुलीच्या विवाह सोहळ्याचे’ आयोजन केले होते.
हुंडाबळी आणि स्त्रीभ्रूणहत्या याविरुद्ध प्रबोधनासाठी लोकसेवा इंग्रजी माध्यम आयोजित बाहुला बाहुली विवाह प्रसंगी शाळेतील विद्यार्थी
यास लोकसेवा शाळेतील विद्यार्थी, पालकांसोबतच परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते.हुंडाबंदी म्हणजेच हुंडा देणे किंवा घेणे यावर कायद्याने बंदी आहे. हुंडा मागणी केल्यास शिक्षा होऊ शकते, असे फलक घेऊन वऱ्हाडींनी वाजत गाजत वर वधू स्वरूपातील बाहुल्यांची मिरवणूक काढली. लग्नात वर वधूंना शुभेच्छा म्हणून उपस्थितांनी झाडांच्या बिया, तुळशीची रोपे, पुस्तके, संगीताचे साहित्य, क्रीडा साहित्य आशीर्वाद स्वरूपात भेट दिले.
विवाह सोहळ्याची संकल्पना व नियोजन ज्येष्ठ माजी कला शिक्षिका व सेवाव्रती प्रतिभा भडसावळे यांनी केले. बाहुल्या पुण्यातील ज्येष्ठ बाहुलीकार जयंत साठे यांनी साकारल्या. याप्रसंगी शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे, संचालक नरहरी पाटील, शॉपीमॉन सर, जाधव सर, सुरेश पाटील, अर्जुन शिंदे, मनीषा तिरकुंडे, अक्षय पोटे, प्रभाकर भडसावळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची जबाबदारी लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडली.