गोल्डन आय न्यूज नेटवर्क
बाबासाहेबांच्या आयुष्यातील रमाईंचे स्थान अनन्यसाधारण : ॲड. सुधाकरराव आव्हाड !
सहनशीलता, त्यागाचे मूर्तीमंत रूप म्हणजे रमाई : ॲड. सुधाकरराव आव्हाड !
ॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के यांचा रमाईरत्न पुरस्काराने गौरव !!
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एकत्र करणारे, संघटित ठेवणारे संविधान दिले, जे जनतेला सर्वश्रेष्ठ मानते. अशा बाबासाहेबांच्या आयुष्यात आपल्या असाधारण त्याग, सहनशीलता, निष्ठेने रमाईंनी आगळेवेगळे स्थान निर्माण केले. रमाईंचे बाबासाहेबांच्या आयुष्यातील स्थान अनन्यसाधारण होते. रमाईंच्या स्मृती आंबेडकरी चळवळीचा प्रेरणास्रोत आहेत.
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) सचिन ईटकर, ॲड. प्रमोद आडकर, ॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के, ॲड. सुधाकरराव आव्हाड, विठ्ठल गायकवाड.
त्या चळवळीचे आपण प्रणेते व्हावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ, ॲड. सुधाकरराव आव्हाड यांनी केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ९०व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज (दि. १५) पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रमाईंचे विचार घराघरात पोहचविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ॲड. वैशाली चांदणे आणि रमाकांत म्हस्के यांचा रमाईरत्न स्मृती पुरस्काराने आव्हाड यांच्या हस्ते या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, संयोजक विठ्ठल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. आव्हाड म्हणाले, पुरस्कारांचे महत्त्व अनेक अर्थांनी असते. ज्या कार्यासाठी पुरस्कार दिला जातो त्या कार्याचा गौरव कार्यकर्त्याच्या पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन देणारा, समाजाकार्यासाठी इतरांना प्रेरणा देणारा असतो.
ॲड. वैशाली चांदणे आणि रमाकांत म्हस्के यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. रमाई नसत्या तर कदाचित आपण सर्वांनी जे बाबासाहेब अनुभवले, पाहिले ते आपण पाहू शकलो नसतो. रमाईंचे हे ऋण सदैव स्मरणात राहिले पाहिजे.
सचिन ईटकर म्हणाले, बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाईंचे स्थान सर्वात महत्त्वाचे होते. रमाईंचा संघर्ष अधिक तीव्र होता. बाबासाहेबांनी क्रांतिकारी कार्य करत राहावे याची आस रमाईंना होती. त्यांच्याविषयी आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे.
पुरस्काराला उत्तर देताना ॲड. वैशाली चांदणे यांनी रमाईंच्या खडतर आयुष्याची कहाणीच उलगडली. त्यागाची परिसीमा म्हणजे रमाई, त्यांनी अनेक कौटुंबिक आघात सोसले, अपत्यांचा वियोग पचवला, आर्थिक विवंचना झेलल्या, परदेशी शिक्षण घेणाऱ्या बाबासाहेबांना झळ लागू दिली नाही, कधीच कुठली तक्रार केली नाही, संसाराचे चटके सहन केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार आनंदाचा आणि अभिमानाचा आहे.
पुरुषप्रधान संस्कृती संपली पाहिजे आणि स्त्री पुरुष समानता प्रस्थापित झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
रमाकांत म्हस्के म्हणाले, रमाईंच्या नावाचा पुरस्कार अभिमानाचा तर आहेच पण सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी वाढविणाराही आहे. रमाईंच्या नावाने असलेल्या सरकारी योजना समजून घेण्यासाठी अभ्यासाची गरज आहे, त्यासाठी जाणीवजागृती आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
स्वागतपर प्रास्ताविक करताना प्रमोद आडकर यांनी सामाजिक दायित्वाची भावना मनात ठेवूनच या उपक्रमाचे आयोजन करत असल्याचे स्पष्ट केले.
विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संविधान वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.