गोल्डन आय न्यूज नेटवर्क
गानवर्धन, एनसीपीएतर्फे रविवारी सकाळच्या रागांची विशेष मैफल !!
आरती अंकलीकर-टिकेकर, मिलिंद चित्ताल यांना ऐकण्याची रसिकांना संधी !!
पुणे : अभिजात संगीताचे गेली 43 वर्षे जतन, संवर्धन करणारी गानवर्धन संस्था आणि एनसीपीए, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळच्या रागांची विशेष मैफल आयोजित करण्यात आली असून आग्रा तसेच ग्वाल्हेर आणि जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर आणि किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित मिलिंद चित्ताल यांचे गायन होणार आहे.
कार्यक्रम रविवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि विश्वस्त सानिया पाटणकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर या पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या शिष्या असून पंडित चित्ताल हे उस्ताद फिरोज दस्तुर यांचे शिष्य आहेत.
सकाळच्या रागांच्या मैफलीचे अभावानेच आयोजन होत असल्याने रसिकांसाठी ही मैफल पर्वणी ठरणार आहे. कलाकारांना भरत कामत, विभव खांडोळकर (तबला), चैतन्य कुंटे, उमेश पुरोहित (संवादिनी) साथसंगत करणार आहे.
गानवर्धनतर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेतील विजेत्यांचा या कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.