सुप्रसिद्ध लेखक दिलीप शामराव कुंभोजकार यांच्या 3 पुस्तकांचे प्रकाशन रविवार दि 25 फेब्रुवारी 2024 रोजी मोठ्या दिमाखात पार पडले.
प्रकाशन समारंभात विचारवंत डाॅ. शिरीष लिमये, सामाजिक नेतृत्व डाॅ. सतीश देसाई, एबीपी माझाचे संपादक श्री राजीव खांडेकर, दिलीप कुंभोजकर आणि अनिल प्रभुणे.
या प्रकाशन समारंभात एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर अध्यक्षस्थानी होते तसेच डॉ सतीश देसाई व डॉ शिरीष लिमये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दिलीप कुंभोजकार लिखित ज्या पुस्तकांचे प्रकाशन झाले त्यांची नावे –
आठवणींची गोधडी – इंद्रायणी साहित्य प्रकाशन
नातवंडांसाठी आजी आजोबांच्या गोष्टी – फिनिक्स प्रकाशन
हिंदू संस्कृती एक आदर्श जीवन पध्दती – फिनिक्स प्रकाशन
रविवार दिनांक २५.०२.२०२४ रोजी झालेल्या प्रकाशन समारंभा निमित्त दिलीप कुंभोजकार माझे मनोगत :
सप्रेम नमस्कार,
पन्नास वर्षापुर्वी असाच एक प्रकाशन समारंभ लक्ष्मीरोडवरील गोखले हाॅल मध्ये झाला होता. आमचे मेव्हणे कै. श्याम कोपर्डेकर, माझे सर्व थोरले बंधू , विशेषतः अशोकनाना यांच्या सहकार्यातून ग्रॅज्युएट होत असताना “रेवती” नावाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले होते. अध्यक्ष होते प्राचार्य शिवाजीराव भोसले.
त्या वेळी मी विद्यार्थी होतो. ते तारुण्यातील झपाटलेले दिवस होते.
संपादक म्हणून मी हे मासिक प्रसिध्द करीत होतो पण….
नंतर आर्थिक जबाबदारीतून व्यवसाय महत्वाचा ठरला आणि त्यात रमलो.
तशी साहित्याची आवड बालपणापासून होती. वाचनाचा पहिला संस्कार माझ्या वडिलांचा म्हणजे आमच्या काकांचा.
चुलत भाऊ काका म्हणत म्हणून आम्हीपण त्यांना काका म्हणत असू.
वडील कृष्णा काठच्या सांगलीचे तर आई पवित्र गोदावरी काठच्या मराठवाडय़ातील. पण हे दोघेही पुण्यात मुळा-मुठा नदी काठी विसावले. १९३५ च्या सुमारास माझे वडील सांगली सोडून पुण्यात आले आणि ज्ञानप्रकाश व Servants of India Society मध्ये कामाला लागले. त्यामुळे घरात संत आणि पंत विचारांची धारा वाहत होती.
वडिलांची वाचनाची आवड आणि त्यांच्या धोतर, कोट आणि काळी टोपी या व्यक्तीमत्वातून बाहेर पडलेले विचार,
छत्रपती शिवाजीमहाराज आणि टिळक, आगरकर, सावरकर यांच्या गोष्टीं ऐकता ऐकता बालपण सरले.
इयत्ता आठवीत असताना मी पंडित नेहरू आणि अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट जाॅन एफ् केनेडी यांच्या पाठोपाठच्या निधनानंतर स्वर्गातील त्यांच्या भेटीचे काल्पनिक संवाद लिहीलेले आठवतात. ते माझे पहिले लिखाण होते.
नंतर माझे मेहुणे कै. श्याम कोपर्डेकर यांनी मला काॅलेज मध्ये शिकत असतानाच “जाड्यारड्या” वर लहान मुलांसाठी पुस्तक लिहावयास सांगितले. ते माझे पहिले पुस्तक १९७२ मध्ये प्रकाशित झाले.
नंतर मी बाणभट्ट यांची कादंबरी व हेलन ऑफ ट्राय चे एक “सुवर्णा” नावाचे फ्युजन लिहीले होते. दुर्दैवाने त्याची एकही प्रत आता शिल्लक नाही.
नंतर प्लास्टिक व्यवसायात इतका बुडालो की या छंदाकडे वाचनाच्या पलिकडे लक्ष दिले नाही.
पण १९९८ च्या सुमारास हाताला लिहीताना कंपवात सुरू झाला… म्हणून कोणीतरी “श्रीराम…. श्रीराम ” लिहायला सांगितले.
यातून प्रेरणा घेऊन “कथा श्रीरामाची” हे कुमारांसाठी पुस्तक लिहीले.
रोटरीत काम करताना “100 Tips For Presidents” असे चित्रमय पुस्तक व Rotary Youth Exchange मधून माझ्या मुलीचा फिनलंड प्रवास व त्यातून आमचे सुरू झालेले Family Exchange वर आधारित
“मी अनुभवलेला फिनलंड” हे पुस्तक लिहीले.
पण परत वाचन आणि लिखाण या छंदाकडे वेळ द्यावयाला मिळाला तो कोवीडच्या सुट्टीत.
सिनियर सिटीझन म्हणून मुले बाहेर सोडत नव्हती आणि घरात लाडक्या नातवंडाचा सहवास घडला.
त्यांना गोष्टी सांगता सांगता लिहून काढल्या त्यातून
“नातवंडांसाठी आजी आजोबांच्या गोष्टी” हे पुस्तक तयार झाले.
प्रासंगिक केलेल्या लिखाणाचे वाचन व संपादन केले ते स्नेही कल्याणी भागवत यांनी. ती “आठवणींची गोधडी” आज प्रकाशित होत आहे. पुस्तकाचे हे नाव पण त्यांनीच सुचविले.
एखादा विषय मनात खूप घोळत असतो… पण वेळ देता येत नसतो.
तो या कोवीड काळात परत वर आला.
मी आणि सुचित्राने बराचसा भारत आणि सुमारे वीस… बावीस देशात प्रवास केला आहे. उघड्या डोळ्याने अनुभव टिपताना, तेथील मराठी घरात वावरताना जे जाणवले, विशेषतः इंग्लंड, अमेरिकेतील भेटीत तेथे जाऊन स्थिरावलेल्या आणि ज्यांची मुले आता तेथेच जन्म घेऊन वाढली आहेत त्यांच्या घरी आपल्या संस्कृतीची महिती असणा-या “रेडी रेकनर” पुस्तकाची गरज जाणवली.
त्या जाणिवेतून “हिंदू संस्कृती – एक आदर्श जीवन पध्दती” हे पुस्तक आकाराला आले.
अभिप्रायार्थ याची लेखन प्रत आपले संस्कृती उपासक श्री चारूदत्त आफळे यांना दिल्यावर त्यांनी सुंदर प्रस्तावना लिहून दिली. ते म्हणाले हे पुस्तक परदेशात असणा-या मराठी लोकांप्रमाणेच आज महाराष्ट्रातही घरोघरी पोचले पाहिजे.
या पुस्तकात संस्कृती आणि टेक्नाॅलाजी याचा संगम आहे.
हाताला लिहीताना होणारा कंप थांबत नव्हता… पण आपल्या स्मार्ट मोबाईलचे Note Pad उपयोगी आले.
ही तीन ही पुस्तके मी मोबाईल व टॅबवर लिहीली आहेत.
ते लिहून झाल्यावर आमच्या स्नेही अनिता कुलकर्णी व स्मिता भागवत यांनी छपाई योग्य प्रत तयार केली.
या दोघींचा मी अत्यंत आभारी आहे.
मला असे नेहमी जाणवते की मुळात असणारे सुप्तगुण बाहेर येत असताना,
संस्कार आणि आपल्या आजूबाजूचे वातावरण, यांच्या संगमातून आपले व्यक्तीमत्व घडत असते, फुलत असते.
आपण एखादे चित्र पाहिल्यावर सहज म्हणतो की
हे चित्र मुळगावकर स्टाईलचे वाटते,
हे चित्र दीनानाथ दलाल स्टाईलचे आहे.
किंवा एखादे गुढ लिखाण जी.ए. कुलकर्णी यांच्यासारखे वाटते, ही भय कथा नारायण धारण यांच्या सारखी वाटते… वगैरे.
एखाद्याचे गाणे भीमसेन जोशी यांच्या सारखे भासते तर कोणीतरी जितेंद्र अभिषेकी सारखा गातो.
चित्रांतून, संगीतातून किंवा साहित्यातून जे व्यक्तीमत्व दिसते ते त्यांच्या वरच्या संस्कारातून प्रगल्भ झालेले असते.
माझ्य लहान पणी टी.व्ही. नव्हता, मोबाईलचा तर प्रश्नच नव्हता पण शनिवार वाडा जवळ होता. त्यामुळे भाषणं ऐकणे हा छंद लागला.
माझ्यावर नाथ पै, एस्. एम्. जोशी, ना.ग. गोरे, रामभाऊ म्हाळगी, जगन्नाथराव जोशी, आचार्य अत्रे, जाॅर्ज फडणीस, बाळासाहेब ठाकरे, पु.ल.देशपांडे वगैरेंच्या भाषणांचे संस्कार कळत नकळत झाले.
आम्ही त्यावेळी देशमुख प्रकाशनची पुस्तके पत्त्यांमधील पाच, तीन, दोन खेळत सहज वाचली.
वि.स.खांडेकर आणि रणजीत देसाई यांची
रु. दोनची ‘अमृतवेल’,
रु. तीनची ‘स्वामी’ आणि
रु. पाचची ययाती वाचत आम्ही मोठे झालो.
यामुळेच वाचनाची आवड तयार झाली. यात बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती आले, शिवाजीराव सावंत यांची ‘मृत्युंजय’ आली. तसेच शालेय पुस्तकातून इरावती कर्वे, दुर्गा भागवत, बहिणाबाई चौधरी भेटावयाच्या… यातून निर्माण झालेल्या आवडी निवडी, दृष्टिकोनातून दररोजच्या जीवनात डोकावताना प्रसंगानुरूप जे सुचले ते लिहीत असतो..
*वाचनाची आणि लिखाणाची आवड असली तरी मी “साहित्यिक” पात्रतेचा नाही याची मला पूर्ण जाणीव आहे.*
पण मी स्वतः मिळणारा आनंद वेचीत गेलो, लिहीत गेलो.
आजचा हा कार्यक्रम म्हणजे या आनंदाचे सादरीकरण आहे एवढेच मी म्हणीन.
मला सतत प्रोत्साहन घरच्यांकडून मिळाले आहेच पण विशेष उल्लेख केला पाहिजे तो सुचित्राचा. .. कारण बहुतेक सर्व लिखाणाची पहिली वाचक ती आहे आणि मार्गदर्शक ही आहे.
या पुस्तकांच्या निर्मिती मध्ये माझा भाचा सागर व त्याची पत्नी व ‘आठवणींची गोधडी’ची प्रकाशिका – मुग्धा कोपर्डेकर,
आर्टिस्ट शेखर डेरे,
नवीन उमेदीचे प्रकाशक श्री अनिल प्रभुणे आणि त्यांची टीम, चित्रकार निलेश महाजन,
आमचे परममित्र दिलीप कुलकर्णी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. त्यांचा कायम ऋणी राहण्यातच मला आवडेल.
आपणां सर्वांच्या उपस्थितीने झालेला आनंद व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.
दिलीप कुंभोजकर.
जाहिरात