गोल्डन आय न्यूज नेटवर्क :
जेष्ठ अभिनेत्री सुहासिनीताई देशपांडे यांना महाराष्ट्र शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदान करण्यात आला.
सुहासिनी देशपांडे यांना हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबईतील एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास सिनेमा व नाट्य क्षेत्रातील नामवंत कलाकार यांची लक्षणीय उपस्थिती होती.
शासनाच्या ह्या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , शालेय शिक्षण मंत्री व मुंबई पालक मंत्री दीपक केसरकर व लोकसभा सदस्य अरविंद सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्रसंगी सुहासिनी देशपांडे यांचा सिनेमा व नाट्यजीवन प्रवास दाखवणारी चित्रफित देखील दाखविण्यात आली.
सुहासिनीताई देशपांडे यांनी वयाच्या 12 वर्षांपासून कला क्षेत्रात कामाला सुरुवात केली व गेल्या 70 वर्षात त्यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटात लक्षणीय भूमिका केल्या आहेत. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटात देवकीनंदन गोपाला , वारसा लक्ष्मीचा , काळूबाईच्या नावानं चांगभलं , पुढचं पाऊल , आज झाले मुक्त मी , धग , माहेरचा आहेर , गड जेजुरी , आम्ही दोघे राजा राणी , बाईसाहेब , मानाचं कुंकू मानाचा मुजरा इत्यादी आहेत.
तसेच रंगभूमीशी सतत संलग्न राहून तुझं आहे तुझ्या पाशी , कथा अकलेच्या कांद्याची , बेल भंडार , सुनबाई घर तुझंच आहे , राजकारण गेलं चुलीत , चिरंजीव आईस , सासूबाईंचं असंच असतं , लग्नाची बेडी अशा नाटकांचे हजारो प्रयोग त्यांनी केले आहेत.
शिवाय भानगडी शिवाय पुढारी नाही , भानगडी शिवाय गाव नाही , सोळावं वरीस धोक्याचं , एक तमाशा सुंदरसा इत्यादी वगनाट्यात देखील प्रभावी पणे कामे केली आहेत.
सिने नाट्यसृष्टीच्या नक्षत्रामध्ये सदैव चमकत राहो शुक्राची चांदणी , रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत देशपांडे सुहासिनी या शब्दात शासनाने त्यांचा मानपत्र देऊन सन्मान व गौरव केला आहे.
शासनाने आपल्या 70 वर्षाच्या कामाची दखल घेऊन मला हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला आहे त्या बद्दल मी महाराष्ट्र शासनाची खूप खूप ऋणी व आभारी आहे असे सुहासिनी देशपांडे या प्रसंगी म्हणाल्या.
Golden Eye News तर्फे सुहासिनीताई देशपांडे यांचे हार्दीक अभिनंदन व उत्तम आरोग्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा !
जाहिरात