गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्रदूषण न रोखल्यास मानवी अस्तित्वालाच धोका : रमेश खरमाळे
ग्रीन सोल्यूशनतर्फे खरमाळे दाम्पत्याला जीवन गौरव पुरस्कार प्रदान
पर्यावरण रक्षण ही देखील देशसेवाच : रमेश खरमाळे
पुणे : प्लास्टिकचा अनिर्बंध वापर रोखणे ही आजच्या काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षण ही देशसेवा समजून कार्य केले तरच भविष्यात मानव जीवंत राहू शकेल, असे प्रतिपादन माजी सैनिक, वॉटरमॅन, पर्यावरणवादी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रमेश खरमाळे यांनी केले.
ग्रीन सोल्यूशनच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना खरमाळे बोलत होते. रागा पॅलेस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळ, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
ग्रीन सोल्यूशन आयोजित सोहळ्यात रमेश खरमाळे आणि स्वाती खरमाळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी सागर अहिवळे, आरती भोसले-अहिवळे, शरद तांदळे, डॉ. विद्यानंद मोटघरे, डॉ. संदीप मेश्राम, प्रा. डॉ. प्रकाश राऊत आदी.
ग्रीन सोल्यूशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर अहिवळे, आरती भोसले-अहिवळे, प्रसिद्ध लेखक शरद तांदळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे, सीओईपीचे सहअधिष्ठाता डॉ. संदीप मेश्राम, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विषयाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रीन सोल्यूशन पर्यावरण क्षेत्रात करीत असलेल्या कार्याचा गौरव करून रमेश खरमाळे म्हणाले, शहरापेक्षा ग्रामीण भागातील प्लास्टिकचा प्रश्न गंभीर आहे. यातून वीषयुक्त अन्नधान्याची निर्मिती होत आहे. जनावरांच्या आरोग्यासही धोका निर्माण होत आहे. प्रदूषणात वाढ झाल्यामुळे कार्बन उत्सर्जनही मोठ्या प्रमाणात होत असून त्यातूनच तापमानवाढीच्या जागतिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या करिता प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरण वाचविण्याची गरज आहे.
शरद तांदळे म्हणाले, पर्यावरण रक्षण हे आता फक्त सामाजिक कार्य राहिले नसून या क्षेत्रातही उद्योग व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. डॉ. विद्यानंद मोटघरे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी ग्रीन सोल्यूशनने छोटी छोटी पावले उचलत जागतिक स्तरापर्यंत कार्य करावे.
डॉ. प्रकाश राऊत म्हणाले, माझ्या विद्यार्थ्यांनी ग्रीन सोल्यूशनच्या माध्यमातून पर्यावरणाच्या क्षेत्रात केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ही संस्था अखंडितपणे कार्य करीत आहे.
प्रास्ताविकात आरती भोसले-अहिवळे यांनी ग्रीन सोल्यूशनच्या कार्याविषयी माहिती देत अदम्य इच्छाशक्ती, कष्ट आणि जिद्द या जोरावर वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी योजनांविषयी सागर अहिवळे यांनी अवगत केले. यशोधन रामटेके, डॉ. गणेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले.