गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव !!
पुणे : आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे चालविणाऱ्या तसेच ही चळवळ तळागाळात पोहोचवणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
तथागत गौतम बुध्द, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आणि खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे १७ वे वर्ष आहे.
सम्यक पुरस्कारप्राप्त मान्यवर व संयोजक
आंबेडकरी विचारवंत वसंतदादा साळवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे स्वागताध्यक्ष होते. तर कार्यक्रमाचे संयोजन नागेश भारत भोसले यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बिशप थॉमस डाबरे, सिने अभिनेते मिलिंद शिंदे, माजी सनदी अधिकारी सदानंद कोचे, ज्येष्ठ समाजसेवक गणपत गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरी नेते ठकाजी बाबा गायकवाड, वंचित बहुजन आघाडी प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, ज्येष्ठ विधिज्ञ गायत्री कांबळे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते अनिल गायकवाड, शिल्पकार आणि चित्रकार गोपाळ गंगावणे, आदर्श पालक नेहा आणि विजय ननवरे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान युद्धात मरण पावलेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद गोचे यांनी बौद्ध धर्माच्या पाच शीलाचे पालन करा, शिका आणि समाजासाठी काम करा असे आवाहन केले.
पारलिंगी समाजाला सन्मानाने जगायला शिकविले, असे मत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन झाले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कला दिग्दर्शक संतोष संखद आणि दीपक मस्के यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.