गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुचित्रा खरवंडीकर, सोनाली वाजागे यांना ‘आशा पुरस्कार’!
महिला दिनानिमित्त उपक्रम : स्वानंद सोशल फेडरेशन, संवाद, पुणेतर्फे रविवारी गौरव सोहळा!
पुणे : स्वानंद सोशल फेडरेशन आणि संवाद, पुणेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आशा सुमतीलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘आशा पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांग असूनही मेहंदी मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सुचित्रा खरवंडीकर आणि उत्तम ज्युडोपटू सोनाली वाजागे यांचा ‘आशा पुरस्कारा’ने सन्मान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्करांचे वितरण ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते होणार असून राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आशा सोशल फेडरेशनचे प्रमुख संजीव शहा, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, श्रुती साठे यावेळी उपस्थित होत्या.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त स्त्रीच्या भावविश्वाचा प्रवास उलगडणारा ‘ती’ची गाणी हा विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पाळण्याची दोरी हातात घेतलेल्या माऊलीपासून ते अन्यायाविरुद्ध लढताना सावली होऊन पाठीशी उभ्या राहणाऱ्या स्त्रीचे मोठेपण गीतांमधून समोर येणार आहे.
धनंजय पवार आणि चैत्राली अभ्यंकर हे गायक कलाकार असून विवेक परांजपे (की-बोर्ड), दीप्ती कुलकर्णी (संवादिनी), राजू जावळकर (तबला), उद्धव कुंभार (ताल वाद्य) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती चैत्राली अभ्यंकर यांची असून निवेदन स्नेहल दामले करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
पुरस्कारप्राप्त महिलांविषयी..
सुचित्रा खरवंडीकर : 78 टक्के शारीरिक अपंगत्व असलेल्या सुचित्रा खरवंडीकर पुण्यातील पहिल्या महिला व्हिलचेअर ढोलवादक असून 2015 पासून युवा वाद्य पथकात ढोल वादन करीत आहेत.
त्यांचे बी.कॉम पर्यंतचे शिक्षण झाले असून त्या मेहंदी रेखाटनाचे प्रशिक्षण देत आहेत. त्याच प्रमाणे पाककला, बॅकिंग क्षेत्रातही त्यांची कारकीर्द आहे. आर्ट कॉर्नर या संस्थेतर्फे सुचित्रा खरवंडीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वात लांब मेहंदी मॅरेथॉनचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला असून त्यांनी बारा तासात 1622 हातांवर मेहंदी रेखाटली आहे.
त्याच प्रमाणे आशिया खंडात सर्वात लांब मेहंदी मॅरेथॉनचा आशियाई विक्रमही त्यांच्या आर्ट कॉर्नर या संस्थेने प्रस्थापित केला असून 24 मेहंदी कलाकारांनी 12 तासात 2655 हातांवर मेहंदी रेखाटली आहे. सुचित्रा खरवंडीकर यांनी 2017 साली स्पर्धात्मक पोहणे सुरू केले असून राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदकासह विविध स्पर्धांमध्ये 40 पदके जिंकली आहेत.
अहमदाबाद येथे 2019 साली झालेल्या व्हिपीआर मिसेस इंडिया स्पर्धेत व्हिल चेअरवरून सहभागी होत व्हिपीआर मिसेस कॉज्निनियलीटीसाठीचा मुकुट जिंकला आहे. फेबु्रवारी 2020 मध्ये मिस्टिक मिसेस इंडियाकडून त्यांना सर्वोकृष्ट प्रेरणादायी मॉडेल हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
सोनाली वाजागे : एस. पी. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सोनाली वाजागे या उत्तम ज्युडोपटू असून 2019 साली इंग्लडमध्ये भरलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ज्युडो या खेळामध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सोनाली यांनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळविली आहेत. या व्यतिरिक्त त्या महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्वही करत आहेत.