गोल्डन आय न्यूज नेटवर्क
वारसा जपणाऱ्या शिक्षक, विद्यार्थ्यांविषयी अभिमान : आरती पाठक
वास्तुविधान स्मरणिकेचे प्रकाशन : विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनीचे उद्घाटन
पुणे : भारतीय कला प्रसारिणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या नावलौकिकाचा वारसा महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यानी गेली 70 वर्षे जपला आहे आणि तो दर्जा आजचे विद्यार्थी अधिक उंचीवर नेत आहेत याचा मला अभिमान आहे,
असे गौरवोद्गार भारतीय कला प्रसारिणी सभेच्या विश्वस्त, प्रसिद्ध चित्रकार आरती भालचंद्र पाठक यांनी काढले.
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या वास्तुरेखा 2025 ुया प्रदर्शनीचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले असून यांचे उद्घाटन आज (दि. 1) आर्किटेक्टस्, इंजिनिअर्स ॲण्ड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजीव राजे यांच्या हस्ते झाले.
भारतीय कला प्रसारिणी सभेच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या ‘वास्तुविधान 25’ या स्मरणिकेचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रा. उमेश सूर्यवंशी, प्रा. सुषमा पराशर, राजीव राजे, आरती पाठक, डॉ. अभिजित नातू.
या वेळी ‘वास्तुविधान 25’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच बी. एम. पाठक पारितोषिकांचे वितरण आरती पाठक यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. अभिजित नातू, प्रा. सुषमा पराशर, प्रदर्शन समन्वयक प्रा. उमेश सूर्यवंशी, आस्था भागवतकर मंचावर होते.विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृती, छायाचित्रे वास्तुरेखा 2025 या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून हे प्रदर्शन सोमवार, दि. 3 मार्च रोजी सायंकाळी 5 पर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
आरती भालचंद्र पाठक पुढे म्हणाल्या, विद्या नेहमी विनम्रता प्रदान करते आणि ती विनम्र व्यक्तीलाच शोभते हे महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे पाहून जाणवते. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने जागतिक स्पर्धेला सामोरा जाईल याची खात्री आहे. नवनवीन गोष्टी शिकत रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. वास्तुरचना शास्त्र आणि वास्तुविशारद यांचे समाजातील महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
प्रदर्शनाविषयी राजीव राजे म्हणाले, मी या महाविद्यालयाचाच विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. महाविद्यालयातील पाच वर्षांच्या शिक्षण कलावधीत विद्यार्थी फक्त पदवीच संपादन करीत नाहीत तर उत्तम मित्रही जोडतात. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही कितीही यशस्वी झालात तरी तुम्ही शिकलेल्या महाविद्यालयाकडून आदर मिळाल्याने आत्मिक समाधान मिळते. भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सचिव स्व. बी. एम. पाठक यांच्यानावे दिल्या जाणाऱ्या बेस्ट डिझाईन अवॉर्डस्ने इरफान मुल्ला, आदित्य डागा, संकेत बारसे, आदित्य चव्हाण या विद्यार्थ्यांचा आरती पाठक, राजीव राजे यांच्या प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रा. सुषमा पराशर यांनी ‘वास्तुविधान 25’ या स्मरणिकेविषयी माहिती सांगितली. प्रास्ताविकपर स्वागत प्राचार्य डॉ. अभिजित नातू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आस्था भागवतकर, प्रांजल लोखंडे यांनी केले. प्रदर्शनासाठी क्षितिजा पाठक, विधी धनवलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.