गोल्डन आय न्यूज नेटवर्क
मसापतील स्वागतकक्षाला द. के. बर्वे यांचे नाव देणे औचित्यपूर्ण : विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
इतिहास, संस्कृतीचे सत्यदर्शन घडवणे हे सारस्वतांचे काम !!
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची अपेक्षा
मसापमधील प्रा. द. के. बर्वे स्वागतकक्षाचे उद्घाटन !!
पुणे : “आपला इतिहास, परंपरा, संस्कृती यांच्याशी प्रामाणिक नसण्याची वृत्ती सध्या दिसून येत आहे. मात्र, आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे यथार्थ दर्शन सत्याचा अपलाप न करता घडवणे, हे सारस्वतांचे कर्तव्य आहे आहे”, असे उद्गार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी येथे काढले. मसापच्या स्वागतकक्षाला प्रा. द. के. बर्वे यांच्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे नाव मिळाले, हे औचित्यपूर्ण आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतील प्रा. द. के. बर्वे स्वागत कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित (डावीकडून) ॲड. प्रमोद आडकर, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, प्रा. मिलिंद जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, राजीव बर्वे, भारत सासणे, मधुमिता बर्वे आणि डॉ. अश्विनी धोंगड
तसेच बर्वे यांच्यासारख्या उत्तम शिक्षक, लेखक, प्रकाशक असणाऱ्या संवेदनशील व्यक्तीचे नाव असणे, हे भाग्याचे आहे, असेही ते म्हणाले
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष राजीव बर्वे आणि त्यांच्या पत्नी मधुमिता बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून साकारलेल्या, उत्तम लेखक, मराठीचे व्यासंगी प्राध्यापक आणि दिलीपराज प्रकाशन या संस्थेचे संस्थापक प्रा. द. के. बर्वे स्वागत कक्षाचे उद्घाटन आज (दि.12) विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजीव बर्वे, डॉ. अश्विनी धोंगडे, ज्येष्ठ कथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, मसापाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद आडकर व्यासपीठावर उपस्थित होते.
शंकर अभ्यंकर म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था अर्थबळ आणि मनुष्यबळासह वैचारिक बैठकीच्या साथीने शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे घोडदौड करत आहे. मसापशी वैयक्तिक ऋणानुबंध जुळले आहेत.
अशा संस्थेविषयी काही अपप्रवृत्ती व्यर्थ वाद उत्पन्न करत आहेत, हे योग्य नाही. हे सारस्वतांचे स्थान आहे. इथे अपप्रवृत्तींना स्थान नसावे. दुसरीकडे सारस्वतांचीही जबाबदारी आहे, की त्यांनी आपला इतिहास, संस्कृतीशी प्रामाणिक राहून वाचकांना यथार्थ सत्यदर्शन घडवले पाहिजे”.
साहित्य आणि वाङ्मयातील भेदही अभ्यंकर यांनी स्पष्ट केला. साहित्य विकावे लागते तर वाङ्मयाकडे ग्राहक स्वतः धावत जातो. ते काळाच्या कसोटीवर उतरते आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहते. तो वारसा सारस्वतांनी लेखनातून पोचवला पाहिजे, असेही अभ्यंकर म्हणाले.
प्रा. द. के. बर्वे यांच्या नावाने मसापमध्ये स्वागतकक्ष असावा, यामागील भूमिका राजीव बर्वे यांनी स्पष्ट केली.
“बर्वे कुटुंबासाठी आज सोनियाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेच्या स्वागतकक्षाला वडिलांचे नाव मिळणे, याचा परम संतोष आहे. या प्रकल्पाचे श्रेय मसापच्या विद्यमान कार्यकारिणीला आहे. सध्या काही प्रवृत्ती मसापविरोधी भूमिका घेत आहेत, हे योग्य नाही. सध्याची कार्यकारिणी उत्तम काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
वडील प्रा. द. के. बर्वे प्राध्यापक, शिक्षक तर होतेच पण ते लेखक, प्रकाशक, अनुवादक होते”, अशी माहिती बर्वे यांनी दिली.
डॉ. अश्विनी धोंगडे यांनी प्रा. द. के. बर्वे यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. “वडील नामवंत आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लेखक तसेच कुमारांसाठी लेखन करणारे साहित्यिक होते. सुरवातीला ते पत्रकारही होते. आमच्या आईने सुरू केलेल्या शाळेच्या उपक्रमाला सक्रीय पाठिंबा त्यांनी दिला.
शालेय नाट्यवाचन स्पर्धा त्यांनी सुरू केली. संतसाहित्याचा त्यांचा अभ्यास होता. ते उत्तम पत्रलेखक होते. लेखनाचा वारसा आम्हाला वडिलांकडून मिळाला. साहित्यात रमलेला माणूस अशीच वडिलांची प्रतिमा आहे. मसापच्या याच वास्तूत त्यांची पुस्तके प्रकाशित झाली होती. तिथेच आज त्यांच्या नावाचा स्वागतकक्ष व्हावा, याचा आनंद वाटतो“, असे डॉ. धोंगडे म्हणाल्या.
वारसा पुढे नेण्यासाठी पुण्य प्रभाव लागतो, त्या पुण्याचे वहन असावे लागते, जे बर्वे कुटुंबाने केले आहे, अशा शब्दांत भारत सासणे यांनी बर्वे कुटुंबियांचे कौतुक केले. हे योगदान लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही स्तरांवर नोंदवले जात आहे, असेही ते म्हणाले.
व्रतस्थ शिक्षकाचे उचित स्मारक : प्रा. मिलिंद जोशी
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “इतिहास हे त्या त्या समाजाचे सांस्कृतिक संचित असते.
पण परंपरा मोडली तरी चालेल पण त्यापूर्वी ती समजून घ्यायला हवी. लेखकांनी कल्पना आणि वास्तव यांचा खेळ जरूर मांडावा; पण त्यात सत्यापलाप करू नये. मसापच्या स्वागतकक्षाला प्रा. द. के. बर्वे यांचे नाव हे एका व्रतस्थ शिक्षकाचे उचित स्मारक आहे. बर्वे यांची तत्त्वनिष्ठा, विचारदृष्टी, जीवनसन्मुखता आणि मूल्यांशी बांधिलकी या कक्षाला औचित्य देईल, असे त्यांनी सांगितले.
मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.