गोल्डन आय न्युज नेटवर्क
टाळ्या मिळविणाऱ्या कवितांचे वारेमाप पीक : जयंत भिडे यांची खंत !!
कणसूर कवितांचे लिखाण टाळा : जयंत भिडे यांचा सल्ला ?!
कविता अंतर्मुख करायला लावणारी असावी : जयंत भिडे !
रंगत-संगत प्रतिष्ठान, काव्यशिल्पतर्फे कवी जयंत भिडे यांचा कृतज्ञता सन्मान !
पुणे : कविता सहजपणे येते, वाऱ्याच्या झुळुकेप्रमाणे मनाच्या अंगणात उतरते मग शब्दरूप घेते. कविता कधी-कधी वाट पहायला देखील लावते. ज्याची थांबायची तयारी नाही त्याने कवी होऊ नये, कणसूर आणि दोष असणारी कविताही लिहू नये, अशा शब्दांत कवी, गीतकार जयंत भिडे यांनी मत व्यक्त केले.
साहित्यिकांनी दिशाहिन होत असलेल्या समाजाला दिशा देण्याचे काम करावे. नुसत्या टाळ्या मिळणाऱ्या कवितांचे आज वारेमाप पीक आले आहे; परंतु कविता ही नेहमी अंतर्मुख करायला लावणारी असावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग आणि काव्यशिल्प आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, जयंत भिडे, स्वाती यादव, राजश्री सोले.
ज्येष्ठ कवी जयंत भिडे यांच्या काव्य लेखन प्रवासाची 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानचा काव्य विभाग आणि काव्यशिल्प यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा आज (दि. 19) कृतज्ञता सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना भिडे बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, काव्यशिल्पच्या अध्यक्षा स्वाती यादव, सचिव राजश्री सोले मंचावर होते.
सदाशिव पेठेतील भारत स्काऊट ग्राऊंड येथील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि काव्यशिल्प या संस्थांनी नामांकित कलाकारांपेक्षा नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
दुसऱ्याला मोठे झालेले पाहणे यात मनाचा मोठेपणा असावा लगतो, अशा शब्दांत भिडे यांनी आयोजक संस्थांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले, कविता शब्दरूपात कागदावर येण्यापूर्वी कवीने ती स्वत: जगली पाहिजे. कविता किंवा गीत हे गवसावे लागते. स्वत:ला कविता आवडल्याशिवाय कवीने आपल्या कवितेला उंबरा ओलांडू देऊ नये. आई मुलाला जपते त्याप्रमाणे कवीने आपल्या कवितेला जपायला हवे.
काव्यशिल्प ही संस्था गेली 52 वर्षे सातत्याने कार्यरत आहे, याचे कौतुक करून प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, जग हे मैत्रीवर चालले आहे कटुतेवर नाही. स्वत: चुकलो तर मोठ्या मनाने क्षमा मागा आणि दुसरा चुकला तर मोठ्या मनाने क्षमा करायला शिका या विचारातून रंगत-संगत प्रतिष्ठान गेली 32 वर्षे कार्यरत आहे.
काव्यशिल्प संस्थेचा परिचय करून देताना स्वाती यादव यांनी संस्थेतर्फे नवोदित कवींना हक्काचे व्यासीपठ मिळवून दिले जाते असे सांगून संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.सुरुवातीस उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. प्रभा सोनवणे यांनी भिडे यांचा परिचय करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधिका दाते यांनी केले.
सन्मान सोहळ्यानिमित्त आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात अश्विनी पिंगळे, भारती पांडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, प्रतिभा जोशी, सुधीर कुबेर, सीताराम नरके, तनुजा चव्हाण, डॉ. अनिता जठार, स्वप्नील पोरे, कर्नल वसंत बल्लेवार, अजय जोशी, नूतन शेटे, जयश्री श्रोत्रिय, शिरीष सुमंत, मकरंद कुलकर्णी, रवींद्र गाडगीळ, सुरेश शेठ, चंचल काळे, डॉ. नयना कुलकर्णी, अपर्णा आंबेडकर, मनिषा सराफ, आनंद महाजन, साजन पिलानी यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन मनिषा साने यांनी केले.