Marathi FM Radio
Wednesday, February 5, 2025

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे उत्स्फूर्त प्रतिसादात उद्घाटन !!

Subscribe Button
गोल्डन आय न्यूज नेटवर्क

अभिजात दर्जा मिळाला म्हणजे लक्तरे दूर झाली असे नाही
रोटरी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली खंत !

पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे उत्स्फूर्त प्रतिसादात उद्घाटन !!

पुणे : मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण प्रत्यक्षात मराठी भाषेची लक्तरे तशीच आहेत. शहरे, गावे, खेडी, वस्त्यांमधून मराठी भाषेची विदारक वस्तुस्थिती लक्षात घेऊन, योग्य उपाययोजना करायला हव्यात, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी शनिवारी मराठी भाषेच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. काही कोटी रुपये मिळाले म्हणजे भाषा समृद्ध होत नसते, त्यामुळे अनावश्यक हुरळून जाण्याची गरज नाही, अशा शब्दातही त्यांनी कान टोचले.

Advertisement

Advertisement

पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित रागिणी शहा, शितल शहा, चंद्रकांत पाटील, सूर्यकांत वझे, विश्वास पाटील, दीपक शिकारपूर, राजीव बर्वे, चंदू बोर्डे, अभय गाडगीळ, विनोद जाधव, माहन पालेशा, सुधीर राशिंगकर आदी.

Advertisement

सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या रोटरी क्लबतर्फे पुण्यात पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे यांच्या हस्ते आज (दि. 4) झाले. त्या वेळी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून विश्वास पाटील बोलत होते.

Advertisement

कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पहिल्या रोटरी मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात झाली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सावा हेल्थकेअरचे संचालक विनोद जाधव, संमेलनाचे कार्याध्यक्ष राजीव बर्वे, मधुमिता बर्वे, रोटरीचे प्रांतपाल शीतल शहा, रागिणी शहा, उपप्रांतपाल मोहन पालेशा, अभय गाडगीळ, यजमान क्लब अध्यक्ष सूर्यकांत वझे, तसेच संमेलनाचे सह आयोजन करणाऱ्या रोटरीचे अन्य पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले.

Advertisement

विश्वास पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात मराठी भाषेच्या परंपरेचा आढावा घेत आणि बुजुर्ग लेखकांची उदाहरणे देत मराठी भाषेच्या वास्तवाचे दर्शन घडवले. ज्ञानपीठप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकरांनी मराठी भाषा मंत्रालयाच्या दाराशी भीक मागते आहे आणि तिच्या अंगावर लक्तरे आहेत, असे विधान केले होते. त्याचा संदर्भ देत पाटील यांनी, मराठी भाषेच्या अंगावरील लक्तरे अद्यापही तशीच आहेत, अशी टीका केली. “अभिजात दर्जा मिळाला म्हणून लगेच मराठी समृद्ध झाली, असे नाही.

मराठीच्या समृद्धीसाठी आधी खेड्यातून, गावांतून शाळा, ग्रंथालयांमधून प्रयत्न झाले पाहिजेत. तिथे दयनीय अवस्था आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. ग्रंथपालांना लाजीरवाणे मानधन दिले जाते. मराठी भाषेतील ग्रंथव्यवहार चिंताजनक आहे. साहित्याचा आवाज हा मानवी आत्म्याचा आवाज असतो आणि भाषेच्या माध्यमातून तो अभिव्यक्त होतो. ती भाषा जपली पाहिजे, वाढली पाहिजे, व्यवहारात आली पाहिजे, ज्ञानभाषा झाली पाहिजे. भाषा आणि ती बोलणारी, लिहिणारी, वाचणारी माणसे, हे मोठे बळ असते. पण आज मराठी भाषा ते सामर्थ्य हरवून बसली आहे.

एके काळी साहित्यिकांच्या शब्दांना शस्त्रांचे बळ होते, ते पिढ्यांना प्रेरणा देत होते. आता तेच शब्द जातीपातीत अडकून पडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठी माणसांनी आपली दृष्टी विशाल केली पाहिजे. त्यासाठी संशोधनाची गरज आहे. केंद्राने दर्जा दिला, काही कोटी रुपये मिळतील. अंगावर घालायला कोट दिला आहे, पण त्यातून गंजिफ्रॉकची भोके लपत नाहीत, ती दडवण्यात अर्थ नाही, असे ते म्हणाले. ‌‘लाडक्या बहिणींना जरूर साह्य करा पण आपल्या मराठी भाषा, संस्कृतीसाठी कष्ट करणाऱ्या, झटणाऱ्यांचाही गांभीर्याने विचार करा‌’, असा सल्लाही पाटील यांनी दिला.


चंदू बोर्डे यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक कार्यांविषयी कौतुकाचे उद्गार काढले. रोटरीने या संमेलनाच्या निमित्ताने भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विश्वातही नवी दिशा देणारे, प्रेरक आणि नव्या पिढीला भाषेकडे आकर्षित करणारे काम करावे, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी भविष्याचा वेध घेणारा नवा उपक्रम, अशा शब्दांत रोटरीच्या साहित्य संमेलनाचे स्वागत केले.

राज्य सरकारतर्फे मराठी भाषा विभाग, मराठी भाषा भवन, मराठी विद्यापीठ, मराठी वाचन पंधरवडा, ग्रंथ उत्सव, शैक्षणिक शुल्कमाफी असे अनेक उपक्रम भाषेच्या संदर्भात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आता ज्ञान हाच वारसा आहे, तीच खरी मालमत्ता आहे, संपत्ती आहे आणि भाषेच्या, साहित्याच्या माध्यमातून ती प्राप्त करता येते. संमेलनासारखे उपक्रम यासाठी महत्त्वाचे ठरतात, असेही ते म्हणाले.

कार्याध्यक्ष राजीव बर्व्ो यांनी संमेलनामागील भूमिका सांगताना अभिजात दर्जा मिळणे, ही जबाबदारी वाढल्याची जाणीव असल्याचा उल्लेख केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आणि वाचनसंस्कृतीचा बळ मिळावे आणि चांगला समाज घडवण्यासाठी पाठबळ मिळावे, हा संमेलनामागील हेतू आहे‌’, असे ते म्हणाले.

स्वागताध्यक्ष विनोद जाधव म्हणाले, भाषा आपल्या अस्मितेशी, अस्तित्वाशी आणि जगण्याशी निगडीत असते. व्यवहारात मराठी भाषा वाढावी, अधिकाधिक व्यापक अनुभवविश्व भाषेतून व्यक्त व्हावे आणि मराठीचा प्रसार वाढावा, त्यासाठीच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहू.
मोहन पालेशा म्हणाले, रोटरीने सदैव सामाजिक बांधीलकी जपत कार्य केले आहे.

रोटरी साहित्य संमेनलानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत सहभागी मान्यवर.

संमेलनाच्या निमित्ताने भाषिक मैत्र दृढ व्हावे, ही अपेक्षा आहे. सूर्यकांत वझे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले.
यावेळी रोटेरियन आणि लेखक म्हणून उत्तम योगदान देणाऱ्या दीपक शिकारपूर, सुधीर राशिंगकर आणि अभिजीत जोग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कविता अभ्यंकर यांनी आभार मानले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी पदन्यास कथक डान्स ॲकॅडमीच्या रेणुका केळकर-टिकारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणेश वंदना सादर केली.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular