Golden Eye News
अपूर्वा नेमळेकर यांनी उलगडली वैवाहिक आयुष्यातील अनेक गुपिते; सुलेखा तळवलकर शो मधील ‘विवाहप्रसाद शादी का लड्डू’मध्ये मनमोकळा संवाद
मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि त्यांचे पती अनुज गोवळकर यांनी सुलेखा तळवलकर शोवरील ‘विवाहप्रसाद शादी का लड्डू’ या कार्यक्रमात आपल्या वैवाहिक आयुष्यातील अनेक अनुभव, संघर्ष आणि भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या. दोघांचेही हे दुसरे लग्न असल्याने त्यांनी पहिल्या विवाहातील अनुभव, घटस्फोटानंतरचा काळ, समाजाकडून मिळालेली वागणूक आणि नव्या आयुष्याची सुरुवात यावर सखोल चर्चा केली.

मुलाखतीदरम्यान अपूर्वा नेमळेकर यांनी सांगितले की, पहिला घटस्फोट झाल्यानंतर जवळपास नऊ वर्षे त्या एकट्याच होत्या. या काळात त्यांना मानसिक तणाव, सामाजिक दबाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्या कठीण परिस्थितीतून स्वतःला सावरत त्यांनी नव्याने आयुष्य जगण्याचा निर्धार केला. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधला.
सुलेखा तळवलकर यांच्या सहज, संवेदनशील आणि प्रभावी मुलाखत शैलीमुळे अपूर्वा आणि अनुज यांनी आजवर कधीही सार्वजनिकरीत्या न मांडलेले अनेक अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. विवाहसंस्थेविषयीचे त्यांचे विचार, दुसऱ्या संधीचे महत्त्व, नात्यांमधील विश्वास आणि समाजात असलेले अनेक गैरसमज यावर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले.
यावेळी सुलेखा तळवलकर म्हणाल्या की, ‘विवाहप्रसाद शादी का लड्डू’ हा केवळ मनोरंजनासाठीचा पॉडकास्ट नसून, विवाहसंस्थेशी संबंधित विविध सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. लग्नातील गैरसमज, अपेक्षांचे ओझे, विवाहास होणारा विलंब, घटस्फोट आणि त्यानंतरचे आयुष्य अशा अनेक विषयांवर समाजाचे प्रबोधन आणि समुपदेशन व्हावे, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीमध्ये विवाहसंस्थेविषयी निर्माण झालेल्या नकारात्मक समजुती दूर करून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘विवाहप्रसाद शादी का लड्डू’ हा कार्यक्रम सुलेखा तळवलकर शो या यूट्यूब चॅनेलवर दर शनिवारी प्रसारित होणार असून प्रत्येक भागात नवे सेलिब्रिटी, समुपदेशक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.











