गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित उपेंद्र भट यांच्या भजनसंध्येत रसिक तल्लीन !
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे आयोजित शारदोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक उपक्रम !!
पुणे : देवीस्वरूपाचे वर्णन करणारी दुर्गास्तुती, ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’, ‘गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान’, तुंगा तिरदी’, ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारंम्मा’, ‘समचरण तुझे देखिले’, ‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी’, ‘रामनाम उच्चारा जन्माचे सार्थक करा’ अशा पंडित उपेंद्र भट यांनी सादर केलेल्या रचनांनी रसिकांच्या मनातील भक्तीभाव जागृत केला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे यांच्यातर्फे प्रथमच शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. 9) सायंकाळी पंडित उपेंद्र भट यांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते. शारादोत्सव मजेंटा लॉन्स, डी. पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा आयोजित शारदोत्सवात भजनसंध्या सादर करताना पंडित उपेंद्र भट व सहकारी.
बुधवारी सकाळी श्री देवी शारदेची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर तुलाभार सेवा, श्रीसूक्त हवन, पूर्णाहुती हवन, अन्नसंतार्पण, रामनाम जप, दुर्गा नमस्कार, दीपालंकार सेवा अशा विविध धार्मिक कार्यक्रमांसह डॉ. मोनिषा रावत याचे ‘मधुमेह व आरोग्य’ याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सायंकाळी आयोजित भजन संध्येत पंडित उपेंद्र भट यांना पंडित राजगोपाल गोसावी (तबला), उदय शहापूरकर (संवादिनी), गणेश चाकणकर (पखवाज’), आनंद टाकळकर (टाळ), देवव्रत भातखंडे, धनंजय भाटे, नागेंद्र पांचाळ (सहगायन) यांनी साथसंगत केली.
पंडित उपेंद्र भट यांनी भजनसंध्येची सुरुवात ‘सर्वमंगल मांगल्ये’ या देवीस्तुतीने केली. त्यानंतर देवीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपांचे वर्णन करणारे स्तवन सादर केले. गुरू पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गीत प्रभावीपणे त्यांनी केले. गुरूमहती वर्णन करणारी स्वामी स्वरूपानंद यांची ‘गुरूकृपेविण नाही आत्मज्ञान’ ही रचना रसिकांना विशेष भावली. जनार्दन स्वामी रचित ‘तुंगा तिरदी’ हे कानडी भजन सादर केल्यानंतर पुरंदरदास रचित देवी महात्म्य सांगणारे ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारंम्मा’ हे सुप्रसिद्ध भजन सादर केले.
रसिकांनी या रचनेस उत्स्फूर्त दाद दिली. ‘समचरण तुझे देखिले’ हा समर्थ रामदास रचित मराठी अभंग पंडित भाटे यांनी सादर करून रसिकांच्या मनातील भक्तीभावाला द्विगुणीत केले. ‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी’ या रचनेतून भक्ताने देवीकडे केलेली याचना दर्शविली. ‘रामनाम उच्चरा जन्माचे सार्थक करा’ या पदाने पंडित भट यांनी भजनसंध्येची सांगता केली. रामनामाचा गजर करत रसिकांनी त्यांना साथ केली.
कलाकारांचा सत्कार जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे ज्येष्ठ सदस्य सतिश राव आणि गोदावरी राव यांनी केला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे यांनी आयोजित केलेल्या शारदोत्सवामुळे सामाजिक, धार्मिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून युवा पिढीमध्ये संस्कारांची जाणीव होण्यास नक्कीच मदत होईल. मानसिक ताण-तणाव दूर होण्यास, वैचारिक देवाण-घेवाण होण्यास अशा उत्सवांची समाजाला आज गरज आहे, असे मत पंडित उपेंद्र भट यांनी सुरुवातीस व्यक्त केले.
श्री शारदोत्सवानिमित्त पारंपरिक गरबाचे आयोजन करण्यात आले असून यात उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी, उपाध्यक्ष जनार्दन भट, सचिव मंजुनाथ नायक, खजिनदार बिपिन पंडित महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.__
______,,___________________________________
जाहिरात