गोल्डन आय न्यूज नेटवर्क
“पडद्यामागचा सुपरस्टार” — पडद्यामागील कलाकारांचा अनोखा सन्मान सोहळा !!
विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांचा आगळावेगळा उपक्रम !!
पुणे : नाट्यसृष्टीमध्ये दरवर्षी अनेक पुरस्कार सोहळे मोठ्या थाटामाटात संपन्न होत असतात. या सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत, नाटक अशा विविध विभागांतील कलाकारांचा गौरव करण्यात येतो.
हे सर्व नक्कीच महत्त्वाचे आणि स्वागतार्ह आहे. मात्र, नाटक यशस्वी होण्यामागे रंगमंचावर दिसणाऱ्या कलाकारांइतकेच पडद्यामागे शांतपणे, जबाबदारीने आणि अत्यंत मनापासून काम करणाऱ्या अनेक तंत्रज्ञांचेही मोठे योगदान असते.

याच पडद्यामागील कलाकारांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यासाठी विजय पटवर्धन फाऊंडेशन आणि वामसी क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळावेगळा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे नाव आहे — “पडद्यामागचा सुपरस्टार”.
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेचा सन्मान प्रकाशयोजनेची संकल्पना मांडणाऱ्या कलाकाराला मिळतो; पण स्पॉटचे गृपिंग करणारा, घोड्यावर चढून दिवे ॲडजस्ट करणारा आणि संपूर्ण प्रयोगभर डिमरवर बसून अचूक वेळी ब्लॅक आऊट करणारा ऑपरेटर अनेकदा पडद्यामागेच राहतो. नाटकातील संगीत आणि पार्श्वसंगीताला गौरव मिळतो;
पण कलाकारांचे संवाद स्पष्ट ऐकू जातील याची काळजी घेत, योग्य वेळी योग्य संगीत किंवा इफेक्ट सोडणारा संगीत संयोजक मात्र दुर्लक्षित राहतो. नेत्रदीपक नेपथ्याची रचना करणाऱ्या नेपथ्यकाराचा गौरव होतो; पण ते नेपथ्य गाडीतून उतरवून, रंगमंचावर उभे करून आणि प्रयोगानंतर पुन्हा व्यवस्थित गाडीत भरणाऱ्या रंगमंच कामगारांचा सन्मान फारसा होत नाही.
तसेच नाटकाची मोळी बांधणारा, कलाकार आणि तंत्रज्ञांना एकत्र आणणारा, त्यांच्या गरजा पाहणारा आणि संपूर्ण व्यवस्थापन व हिशोब सांभाळणारा निर्मिती प्रमुख, प्रत्येक प्रयोगाला रंगभूषा करणारे सहाय्यक, केशभूषाकार, वेशभूषेची काळजी घेणारा कपडेपट सांभाळणारा कलाकार, प्रॉपर्टी हाताळणारे वस्तुसंकेत, नाटकासाठी प्रवासाची जबाबदारी सांभाळणारे चालक — अशा अनेक पडद्यामागील सहकाऱ्यांचे योगदान नाटकाच्या यशामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते.
या सर्वांचा मनापासून सन्मान करण्यासाठी मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी, संध्याकाळी ५ वाजता, भरत नाट्य मंदिर, पुणे येथे “पडद्यामागचा सुपरस्टार” हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना सहाय्य, सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन, सर्वोत्कृष्ट नेपथ्य निर्माण, सर्वोत्कृष्ट वस्तुसंकेत, सर्वोत्कृष्ट कपडेपटवाला, सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार, सर्वोत्कृष्ट केशभूषाकार, सर्वोत्कृष्ट चालक, सर्वोत्कृष्ट निर्मिती प्रमुख अशा विविध विभागांतील पडद्यामागील कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सुलेखा तळवलकर, प्रसाद शिवरकर, तेजस देवधर, उल्लेश खंदारे आणि कपिल जोशी यांनी या कार्यक्रमास आर्थिक सहाय्य केले आहे. याच कार्यक्रमात निसर्गात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या आवाजांचे अर्थ सांगणारा आणि त्या आवाजांवर आधारित गाण्यांचा एक अनोखा कार्यक्रमही सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे “पहल”.
हा संपूर्ण सोहळा रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. नाटकाशी जोडलेल्या पडद्यामागील या खऱ्या अर्थाने मेहनती आणि महत्त्वाच्या कलाकारांचे कौतुक करण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
चला, आपण सारे मिळून पडद्यामागच्या सुपरस्टार्सना मनापासून सलाम करूया!











