गोल्डन आय न्यूज नेटवर्क
प्र. के. अत्रे परिणामांची तमा न करता व्यक्त होणारे योद्धा होते : मधुकर भावे
प्र. के. अत्रे यांची विधाने राणा प्रतापाच्या भाल्यासारखी : मधुकर भाव !
संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन !
पुणे : आचार्य प्र. के. अत्रे यांना साहित्यातील कुठलाही प्रकार वर्ज्य नव्हता. नाटक, चित्रपट, पत्रकारिता या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च स्थान गाठले होते. एका शब्दात समोरच्याला कसे गारद करावे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी त्यांनी केलेले लिखाण धारदार आणि दिलेली भाषणे अत्यंत प्रभावी होती. ज्यांच्याविषयी ते अत्यंत परखडपणे मते मांडत त्यांच्याबद्दलही अत्रे यांच्या मनात जिव्हाळाच होता. अत्रे म्हणजे परिणामांची तमा न करता व्यक्त होणारे योद्धा होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणात कुणाचाच धाक राहिलेला नाही. पूर्वी विरोधक एकमेकांशी प्रेमाचे संबंध बाळगून असत. महाराष्ट्रात अनेक त्यागी माणसे होती जी पदानेच नाही तर स्वभावाने, गुणांनी मोठी होती. पण आजचा महाराष्ट्र असा नाही याची खंत वाटते असेही भावे यांनी उद्विग्नपणे नमूद केले.
संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्र. के. अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्य महोत्सवानिमित्त ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे ‘प्र. के. अत्रे नाबाद 125’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संरक्षण मंत्री सुशीलकुमार शिंदे होते. तर ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मंगळवारी (दि. 13) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन इटकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र डोमाळे मंचावर होते. या प्रसंगी भावे यांचा सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
संवाद पुणे व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) सुनील महाजन, सुशीलकुमार शिंदे, मधुकर भावे, उल्हास पवार, सचिन इटकर, प्रा. मिलिंद जोशी, रवींद्र डोमाळे.
पुणे आणि अत्रे यांच्यातील स्नेहबंध उलगडून भावे पुढे म्हणाले, अत्रे यांची अर्धी हयात पुण्यात गेली. त्यांनी पुण्यात असतानाच सात नाटकांचे लिखाण केले. त्यांच्या नाटकातील प्रत्येक पात्र हे जिवंत होते. त्यांना प्रत्यक्ष भेटलेले होते. समाजातील विविध रुढी, परंपरा, घटना यांच्यावर आधारित त्यांच्या साहित्यकृती आहेत. त्यांनी लिहिलेले ‘झेंडुची फुले’सारखे विडंबन काव्य पुन्हा होणे नाही. महाराष्ट्रात आजही प्र. के. अत्रे यांच्या बौद्धिक उंचीला स्पर्श करणारी व्यक्ती अद्याप झालेली नाही.
तत्कालिन राजकीय, सामाजिक परिस्थितीवर, राज्यकर्त्यांवर टीका करताना त्यांचे अग्रलेख अतिशय धारदार असत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुबंई राज्य की महाराष्ट्र राज्य असा निर्णय होत नव्हता तेव्हा त्यावेळी कंसाचे पोट फाडीन, विनोबा की माकडोबा, मोरारजी नरराक्षस अशा वैशिष्ट्यपूर्ण मथळ्यांनी अत्रे यांनी अग्रलेख लिहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
साहित्य आणि संपादक एकत्रितपणे हाती घेऊन चालणारा एकमेव संपादक म्हणजे प्र. के. अत्रे होते. त्यांची विधाने राणा प्रतापाच्या भाल्यासारखी असत. नाटककार म्हणूनही अत्रे यांनी अतिशय उत्तम नाट्यकृती निर्माण केल्या तसेच फिरत्या रंगमंचाचा यशस्वी वापर करून ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग अत्रे यांनी पुण्यात केला आणि यासाठी कोल्हापूरमधील म्हादबा मेस्त्री यांच्यावर यंत्रमहर्षी म्हादबा मेस्त्री असा अग्रलेख लिहिल्याची आठवण भावे यांनी सांगितली.
त्यातून अत्रे यांना माणसाच्या गुणांची जाण होती हे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले. अत्रे यांचा सहवास मिळाला ही माझ्या आई-वडिलांची पुण्याईच आहे, असे सांगून भावे म्हणाले, अत्रेसाहेबांनी लावलेली मी एक उदबत्ती आहे जी कुणालाच विझवता येणार नाही.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, अत्रे यांचे बोलणे अत्यंत विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण असे. त्यांची राजकीय व साहित्यिक सुरुवात व जडणघडण पुण्यातच झाली. अत्रे म्हणजे महाराष्ट्राला पडलेले स्वप्न होय. वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.
उल्हास पवार यांनी अत्रे यांच्या रंगतदार आठवणींना उजाळा देत त्यांचा पुण्याशी असलेला अनुबंध उलगडून दाखविला. अत्रे यांची भाषा प्रक्षोभक असली तरी ते अत्यंत भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व होते, असा अनुभव त्यांनी सांगितला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सचिन इटकर, रवींद्र डोमाळे यांनी केले. सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
—————–_————-_————_———–_—
जाहिरात