गोल्डन आय न्यूज नेटवर्क
श्रीकृष्णावरील नाट्यगीतांची रसिकांना श्रावणभेट !!
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे श्रावणगीते सांगीतिक उत्सवात ‘जागृत गिरिधारी’चे सादरीकरण !!
पुणे : ‘धीर धरी जागृत गिरिधारी’, ‘रमा रमण श्रीरंग जय जय’, ‘विराट ज्ञानी’, ‘मुरलीधर श्याम’, ‘पतित तु पावना’ अशा कृष्णरूपाचे वर्णन करणाऱ्या विविध लोकप्रिय नाट्यगीतांनी रंगली श्रावणसरींसह सायंकाळ! निमित्त होते कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे श्रावणगीते सांगीतिक उत्सवाअंतर्गत ‘जागृत गिरिधारी’ या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमाचे.
सं. शाबास बिरबल शाबास, सं. जय जय गौरीशंकर, सं. स्वयंवर, सं. कट्यार काळजात घुसली, सं. होनाजी बाळा, सं. कान्होपात्रा अशा विविध संगीत नाटकांमधील श्रीकृष्णावरील लोकप्रिय नाट्यगीतांचा आनंद रसिकांनी भरभरून घेतला. कार्यक्रम पुण्याई सभागृह, पौड रस्ता येथे आयोजित करण्यात आला होतो.
कृष्णमहतीचे वर्णन करणाऱ्या ‘विश्वनाट्य सूत्रधार तूच श्याम सुंदरा’ या सं. शाबास बिरबल शाबास नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर कृष्ण महिमा वर्णन करणारे ‘धीर धरी जागृत गिरिधारी’, श्रीकृष्णाचे प्रथम दर्शन झाल्यानंतर द्रौपदीच्या मनात उमटलेले भाव व्यक्त करणारे ‘नाथ हा माझा’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ‘गुरू सुरस गोकुळी’, ‘मुरलीधर श्याम’, मोहक रासक्रिडांचे वर्णन करणारे ‘श्रीरंगा कमलाकांता’, श्रीकृष्ण आणि भक्त पुंडलिक भेटीनंतरचे ‘पतित तु पावना’ ही संगीत नाटकातील कृष्णावर आधारित पदे सादर करण्यात आली.
कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्य कलाकार चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर आणि सोमनाथ जायदे यांनी नाट्यगीते सादर केली. कलाकारांना संजय गोगटे (आर्गन), अभिजित जायदे (तबला), अजितेश जायदे (टाळ) यांनी समर्पक साथसंगत केली. ज्येष्ठ गायक-अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी अभ्यासपूर्ण, रसाळ निवेदन केले. कार्यक्रमाची संकल्पना अभिजित जायदे यांची होती.
श्रीकृष्ण महती सांगणारे भागवत, विविध पुस्तके, ऐकलेली कीर्तने यातून या कार्यक्रमाची संकल्पना सुचल्याचे सांगून रसिकांसमोर हा कार्यक्रम पहिल्यांदाच सादर करत आहोत, असे अभिजित जायदे यांनी आवर्जून सांगितले.
सुरुवातीस कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर, कोषाध्यक्ष गणेश गुर्जर, कार्यवाह बळवंत भाटवडेकर, गिरीश शेवडे, विश्वस्त हरिभाऊ मुणगेकर आणि अभिजित जायदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कलाकारांचे सत्कार मुक्ता चांदोरकर यांनी केले. विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेच्या सभासदांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मुक्ता चांदोकर यांनी विशद केली. संस्थेच्या विश्वस्त राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले तर बळवंत भाटवडेकर यांनी आभार मानले.
जाहिरात